spot_img
spot_img
spot_img

टॉवर लाईन रस्त्यावरील २५० अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिखली आणि तळवडे परिसरातील टॉवर लाईन रस्त्यावरील तब्बल २५० मिळकतींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १६ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशानुसार, अतिक्रमण विभाग तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक १ मधील दक्षिण भाग, चिखली तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील तळवडे परिसरातील अतिउच्च दाब विद्युत वाहिनीखालील टॉवर लाईन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ही मोहीम राबविण्यात आली.

या परिसरात विद्युत वाहिनीखाली धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, दुकानांसमोरील वाढीव ओटे आणि अन्य अतिक्रमणांमुळे सार्वजनिक रस्त्याच्या वापरात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे सुमारे १.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

या धडक कारवाईदरम्यान २५० मिळकतींवरील अतिक्रमणे हटवून एकूण सुमारे १६ हजार ५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कारवाईसाठी तीन जेसीबी, एक ट्रॅक्टर ब्रेकर आणि दहा कंत्राटी मजुरांचा वापर करण्यात आला.

या मोहिमेत उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल्ल भोकरे, ऐश्वर्या मासाळ आणि सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईदरम्यान पाच पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २६ जवान आणि महापालिकेचे चार मजूर तैनात होते.

महापालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे टॉवर लाईन रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शहरातील धोकादायक अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने अशीच सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!