spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा; संविधान दौड, प्रबोधनात्मक गीतगायन आणि व्याख्यानातून संविधान मूल्यांचा जागर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय संविधानाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत संविधानातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा जागर करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान दौड, प्रबोधनात्मक गीतगायन, व्याख्यान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवसाची सुरुवात चिंचवड येथील क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक येथून संविधान दौडीने झाली. महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते दौडीचे उद्घाटन करण्यात आले. चिंचवड येथून सुरू झालेल्या या दौडीचा समारोप पिंपरी चौक येथे झाला. यावेळी उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला.

त्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर मा. रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

पिंपरी येथील भीमसृष्टी शेजारील मैदानावर दिवसभर विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कबीर नाईकनवरे, कुणाल वराळे, माया विजय सरतापे प्रस्तुत विजय सरतापे व सहकारी, एस. के. प्रोडक्शन प्रस्तुत चंद्रकांत शिंदे तसेच सुनंदाई कला, मुंबई प्रस्तुत योगेश विठ्ठल पवार यांनी प्रबोधनात्मक गीतगायनातून संविधानातील विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला.

सायंकाळी संविधान अभ्यासक नूरखा पठाण (माणगाव, महाड) यांचे ‘भारतीय संविधान’ या विषयावर विशेष प्रबोधनपर व्याख्यान झाले. संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

सायंकाळी पिंपरी चौक येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त अण्णा बोदडे, महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

संविधान दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमधून नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच लोकशाही मूल्ये, सामाजिक समता आणि बंधुतेचा विचार अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रबोधनात्मक गीतगायन आणि व्याख्यानांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!