ईशा नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर यशवंत बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनचा अतिवापर टाळावा. उन्हात बाहेर जाताना काळ्या चष्म्याचा वापर करावा. डोळ्यांनी अंधुक दिसू लागल्यास वेळ न दवडता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे मार्गदर्शन ईशा नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर यशवंत बोऱ्हाडे यांनी केले.
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या नोव्हेंबर महिन्यातील मासिक सभेत ते बोलत होते. यावेळी बोऱ्हाडे यांनी ईशा नेत्रालयामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांच्या विविध समस्यांवर उपचार केले जात असून, ज्येष्ठांसाठी मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती दिली.
संघाचे संस्थापक विशाल काळभोर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विविध वैयक्तिक उपक्रमांची माहिती सभेत दिली. तसेच संघाची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सभेचे अध्यक्ष पंढरीनाथ डोके यांनी ज्येष्ठांनी साखर, मीठ आणि आट्याचे सेवन मर्यादित ठेवून आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले.
सभेची सुरुवात जयलक्ष्मी अमीन, मालती कवडे आणि कस्तुर कांबळे यांच्या प्रार्थनेने झाली. ज्येष्ठ नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या भेटवस्तू विशालदादा काळभोर यांच्या वतीने देण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी विजय निकम, विजय सुर्वे आणि रवींद्र मांजरेकर यांनी सहकार्य केले. गोविंद देशमुख, इब्राहिम शेख आणि अभय भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले, तर संघाचे सचिव एकनाथ कालेकर यांनी आभार मानले.




Total Users : 245104