spot_img
spot_img
spot_img

NEET परीक्षेत ४९७ गुण मिळवून अन्सारी नाझरा खातूनची MBBS साठी निवड; फातिमा शेख संस्थेतर्फे १० हजार रुपयांची शैक्षणिक मदत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उर्दू माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील माजी विद्यार्थिनी अन्सारी नाझरा खातून रहमतुल्लाह हिने NEET परीक्षेत ४९७ गुण मिळवत मुंबईतील एका सेमी-गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालयात MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल PCMC उर्दू माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणि विद्यालयाच्या वतीने ‘सत्कार व प्रेरणा सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपशिक्षण अधिकारी राठोड साहेब होते. प्रमुख उपस्थिती म्हणून फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष तथा PCMC उर्दू माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथील शिक्षक आकिब सर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून यशवंतराव उर्दू प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुबीना मिस, सहाय्यक शिक्षिका समीना मिस, हजेरा आपा तसेच फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष  आकिब सर यांनी अन्सारी नाझरा खातून हिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी संस्थेतर्फे १० हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली. तसेच तिच्या यशाचे कौतुक करून इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आकिब सर यांनी सांगितले की, सन २०२१ मध्ये फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८ ते १० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच दोन ते तीन ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून, सध्या २०० हून अधिक विद्यार्थी या वर्गांच्या माध्यमातून संगणक शिक्षण घेत आहेत.

केवळ आर्थिक मदत करणे एवढाच संस्थेचा उद्देश नसून, समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. विशेषतः MPSC, UPSC, डॉक्टर, वकील यांसारख्या क्षेत्रांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आर्थिक सहकार्य, योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते.

PCMC परिसरातील महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही असेच एक शैक्षणिक व्यासपीठ निर्माण करण्याचा संस्थेचा मानस आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्ग व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन, संधी आणि सहकार्य मिळाल्यास अन्सारी नाझरा खातूनसारखे अनेक विद्यार्थी पुढे येऊ शकतात. महानगरपालिका शाळांमधून अधिकाधिक डॉक्टर, अधिकारी, वकील व यशस्वी व्यक्तिमत्त्वे घडावीत, हेच संस्थेचे ध्येय असल्याचे आकिब सर यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक मोहसिन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकिब सर यांनी केले. मीना मिस यांनी आभार प्रदर्शन केले, तर नईम सर यांनी बैठक व्यवस्थेची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली.

कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अन्सारी नाझरा खातून रहमतुल्लाह हिच्या NEET परीक्षेतील ४९७ गुणांच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले. महानगरपालिका शाळेतून शिक्षण घेऊन MBBS वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणारी नाझरा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली असून, तिच्या यशामुळे उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे. तिच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सत्कार, शैक्षणिक मदत आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देणाऱ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!