spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच हॉकर झोनची निर्मिती; आयुक्त विजय सूर्यवंशी यांची घोषणा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध हॉकर झोन निर्माण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये योग्य जागांची पाहणी करून पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी न्याय्य जागा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया गतिमान करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त तथा पथविक्रेता समितीचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २०२३ नंतर प्रथमच पथविक्रेता समितीची बैठक आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील पथविक्रेत्यांचे प्रश्न, हॉकर झोनची निर्मिती, प्रमाणपत्र वाटप आणि पथविक्रेता कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त सीताराम बहुरे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्यासह समिती सदस्य, क्षेत्रीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत आयुक्त सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागांतील संभाव्य हॉकर झोनच्या जागांची पाहणी करून नियोजन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. पथविक्रेत्यांना आवश्यक सोयीसुविधांसह व्यवसायासाठी सुसज्ज जागा उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. तसेच बोगस सर्वेक्षण आणि बोगस प्रमाणपत्रांच्या प्रकरणांवर कारवाई केली जाईल. पात्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असून, समितीच्या बैठका नियमित घेण्यावरही भर दिला जाणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी शहरातील सुमारे ३० हजार पथविक्रेत्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पथविक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. हॉकर झोन निर्मितीसाठी आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागू नये. पुढील चार महिन्यांत हॉकर झोन निश्चित करून पात्र विक्रेत्यांना कायमस्वरूपी व्यवसायाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना पथविक्रेत्यांसाठीही आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवसाय व्यवस्था निर्माण करून ‘स्मार्ट हॉकर’ ही संकल्पना राबविण्याचा प्रस्ताव नखाते यांनी मांडला. यामुळे शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था आणि पथविक्रेत्यांचा रोजगार यांच्यात समतोल साधता येईल, असे त्यांनी नमूद केले.

प्रामाणिक पथविक्रेत्यांना संरक्षण मिळावे आणि प्रत्यक्ष व्यवसाय न करता बोगस सर्वेक्षणाच्या आधारे प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिकाही नखाते यांनी मांडली. त्यामुळे आगामी काळात महापालिकेच्या हॉकर झोन निर्मितीच्या निर्णयाकडे शहरातील हजारो पथविक्रेत्यांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!