spot_img
spot_img
spot_img

पुणे ग्रँड टूर-२०२७ च्या नियोजनाला वेग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न!

२५ आंतरराष्ट्रीय संघ आणि १२५ सायकलपटूंचा सहभाग; स्पर्धेला स्व. अजितदादांचे नाव देण्याची मागणी, आमदार सुनील शेळके यांची बैठकीला उपस्थिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुण्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम करणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर-२०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियोजनाला वेग आला असून, यासंदर्भात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या स्पर्धेत २५ आंतरराष्ट्रीय संघ आणि सुमारे १२५ खेळाडू सहभागी होणार असून, या माध्यमातून पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीत स्पर्धेच्या नियोजनासह सायकलपटूंची सुरक्षा, रस्त्यांची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी स्पर्धेला स्वर्गीय अजितदादांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच नव्याने विकसित होणाऱ्या सायकल ट्रॅकची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी रस्ते खोदण्याच्या परवानग्या देण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांऐवजी केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडे असावेत, अशी मागणीही बैठकीत मांडण्यात आली.

या महत्त्वपूर्ण बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. याशिवाय विभागीय आयुक्त शीतल तेली, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीए आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आमदार शंकरराव मांडेकर, बाबाजी काळे, चेतन तुपे, हेमंत रासने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘पुणे ग्रँड टूर-२०२७’च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन होणार असल्याने क्रीडा पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि जिल्ह्याच्या जागतिक ओळखीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे स्पर्धेचे नियोजन दर्जेदार आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे असावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!