शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराची विकासात्मक वाटचाल, नागरी सुविधांचे नियोजन, बदलती लोकसंख्या आणि भविष्यातील शहरी आव्हाने यांचा अभ्यास करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई येथील संशोधक विद्यार्थ्यांनी आज महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. पुढील दहा दिवस हे विद्यार्थी शहरातील विविध विभागांना भेटी देऊन सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणार आहेत.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या विकासप्रवासाची माहिती देताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. १९७० च्या दशकात अवघी ३० हजार लोकसंख्या असलेल्या या शहराची लोकसंख्या २००१ मध्ये १० लाखांपर्यंत पोहोचली. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या सुमारे १७ लाख होती. औद्योगिकीकरण, रोजगाराच्या संधी आणि उपलब्ध नागरी सुविधांमुळे शहराचा विस्तार वेगाने झाला असून, सध्या शहराची अंदाजित लोकसंख्या सुमारे ३६ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, जलवाहिन्या, मलनिस्सारण व्यवस्था आणि अन्य मूलभूत पायाभूत सुविधांचे नियोजन व विस्तार करण्यावर महापालिका सातत्याने भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडची औद्योगिक नगरी म्हणून निर्माण झालेली ओळख, त्यानंतर गार्डन सिटी म्हणून झालेली वाटचाल आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात शहराने मिळवलेले राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शहराच्या विकासातील उद्योगविश्वाचे योगदान, रोजगाराच्या संधी, वाढते नागरीकरण, नागरिकांच्या बदलत्या अपेक्षा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहराचा अभ्यास करताना केवळ लोकसंख्या किंवा विकासकामांची आकडेवारी समजून घेणे पुरेसे नसून, शहराच्या जडणघडणीमागील नियोजन, नागरिकांच्या गरजा, प्रशासनासमोरील आव्हाने आणि भविष्यातील विकासाच्या संधी यांचाही सखोल विचार होणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शहरातील परिस्थिती जाणून घेऊन अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, नगरसेविका श्रुती वाकडकर, उपायुक्त अण्णा बोदडे, CSR कक्षाचे विजय वावरे उपस्थित होते.
“पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांच्या विस्तारापुरता मर्यादित नसून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनातून समोर येणारी निरीक्षणे आणि सूचना शहराच्या भविष्यातील विकास नियोजनासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
“शहराच्या विकासप्रक्रियेत शैक्षणिक संस्था आणि संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, नागरिकांशी संवाद आणि अभ्यासपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शहरी व्यवस्थापनाची व्यापक माहिती मिळेल. अशा उपक्रमांमुळे शिक्षण, संशोधन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल.”
— रविना आंगोळकर, सभापती, शिक्षण समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका




Total Users : 243692