spot_img
spot_img
spot_img

जनगणना-२०२७ साठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशाच्या विकासाचे नियोजन आणि विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणकांमार्फत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

जनगणना-२०२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन, स्वगणना मोहीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबत या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी जनगणना-२०२७ चे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये डिजिटल स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत “se.census.gov.in” या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन नोंदविता येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून कुटुंबातील सर्व सदस्यांची अचूक माहिती भरावी लागणार आहे. तसेच, यापूर्वी लॉगिन न केलेल्या नागरिकांनाही नव्याने लॉगिन करून आपल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती नोंदविता येणार आहे. 

माहिती सादर केल्यानंतर ‘P’ अक्षराने सुरू होणारा ११ अंकी स्वगणना ओळख क्रमांक (SE ID) मिळणार आहे. हा क्रमांक जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष गृहभेटीदरम्यान प्रगणकांना हा क्रमांक दाखविल्यास माहिती पडताळणीची प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. 

स्वगणनेनंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकसंख्येची गणना करणार आहेत. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत पुनरीक्षण फेरी राबविण्यात येणार आहे. डिजिटल सुविधेचा लाभ घेतल्यास नागरिकांना माहिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः तरुणांनी आणि तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कुटुंबांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

माहिती गोपनीय राखली जाणार असल्याने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका: 

जनगणनेदरम्यान संकलित करण्यात येणारी नागरिकांची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती जनगणना कायदा, १९४८ अंतर्गत गोपनीय ठेवली जाते. या माहितीचा वापर कायद्याने निश्चित केलेल्या जनगणनेच्या उद्देशांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी केला जात नाही. तसेच, जनगणनेच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीकडून ओटीपी, पिन किंवा अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती द्यावी आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण आधार आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती नोंदविली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वगणना सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच, प्रगणक घरी आल्यानंतर त्यांना योग्य व संपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे. जनगणना-२०२७ ही सामूहिक जबाबदारी समजून प्रत्येकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.” 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, “पिंपरी चिंचवड शहरातील जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज होत आहे. स्वगणनेच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या माहिती नोंदविण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी स्वगणना पूर्ण केल्यानंतर प्राप्त होणारा ११ अंकी SE ID जतन करून ठेवावा आणि प्रत्यक्ष गणनेच्या वेळी प्रगणकांना उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाला सहकार्य करून जनगणनेचे हे राष्ट्रीय कर्तव्य यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.” 

उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, “जनगणना-२०२७ ची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक पूर्वतयारी आणि समन्वय साधण्यात येत आहे. नागरिकांनी स्वगणना प्रक्रियेत स्वतःहून सहभाग घ्यावा. प्रगणक गृहभेटीसाठी आल्यानंतर त्यांना संपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची माहिती देऊ नये. नागरिकांच्या सहकार्यामुळे जनगणनेची प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यास मदत होईल.” 

जनगणनेविषयी अधिक माहितीसाठी: नागरिकांनी “www.censusindia.gov.in” या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. स्वगणनेसाठी “se.census.gov.in” या पोर्टलचा वापर करावा. तसेच, १८५५ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. ‘आपली जनगणना, आपला विकास’ आणि ‘जनगणना से जन कल्याण’ या ब्रीदवाक्यांनुसार नागरिकांनी या राष्ट्रीय उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केले आहे. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!