शबनम न्यूज | प्रतिनिधी
खेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त वाशेरे गावात ३५० गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणा साहित्य असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम पार पडला.
आमदार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका सारिका रविभाऊ गायकवाड आणि हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे सदस्य रविंद्र गजेंद्र गायकवाड यांनी वाटपासाठी पुढाकार घेतला. दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबांच्या दैनंदिन किराणा खर्चाला हातभार लावण्याच्या उद्देशाने ही मदत देण्यात आली.
आमदार लांडगे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये सांगली आणि कोल्हापूरच्या महापुरानंतर सुमारे १५ हजार कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्यात आले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना गोधनाचीही मदत करण्यात आली. २०२१ मध्ये महाड, चिपळूण, सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी २६ ट्रक मदत साहित्य रवाना करण्यात आले.
२०२५ मध्ये मराठवाडा, सोलापूर आणि इतर पूरग्रस्त भागांतील १०० हून अधिक गावांपर्यंत ५० हून अधिक वाहनांतून जीवनावश्यक साहित्य पोहोचविण्यात आले. त्याच मदतकार्याच्या पहिल्या टप्प्यात गरजू शेतकऱ्यांना १०६ गायींचे मोफत वाटप करण्यात आल्याचे कार्यालयाने नमूद केले.
“दुष्काळाच्या काळात घरचा किराणा खर्च भागवणं अनेक कुटुंबांसाठी कठीण होतं. ही गरज लक्षात घेऊन आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाशेरेतील ३५० गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतकं किराणा साहित्य दिलं. दादांच्या सेवाकार्यातून प्रेरणा घेऊन या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहता आलं, याचं मनापासून समाधान आहे.”
– सारिका गायकवाड, नगरसेविका व स्थायी समिती सदस्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.




Total Users : 243704