spot_img
spot_img
spot_img

​संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड-२०२६’चे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि युवा पिढीमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी दिली.

​भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शहरात पहिल्यांदाच भव्य ‘संविधान सन्मान दौड’ आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे,आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दरवर्षी ही भव्य संविधान सन्मान दौड आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

​प्रस्तावित ‘संविधान सन्मान दौड-२०२६’ ही गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौक, चिंचवड येथून सुरू होऊन भीमसृष्टी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे संविधान प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने समाप्त होणार आहे. साधारण दिड किलोमीटर अंतराच्या या दौडीत शहरातील महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, उद्योजक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पत्रकार, शिक्षक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, क्रीडा संघटना आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आयोजकांकडून सहभाग प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे.

​२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही दौड केवळ क्रीडा स्पर्धा न राहता राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये जनमानसात रुजवणारी लोकचळवळ ठरावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

​या उपक्रमाबाबत बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, लोकशाही मूल्यांचा जागर, संविधानाप्रती आदर आणि सामाजिक समतेचा विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संविधान दिनानिमित्त शहरात व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन संविधान दिन उत्साहात आणि जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
​ही केवळ धाव नसून संविधानाचा सन्मान, लोकशाहीवरील विश्वास आणि आपल्या नागरिक कर्तव्याची जाणीव आहे. त्यामुळे संविधानाचा विचार मनात घेऊन एकतेच्या पावलांनी पुढे जाण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजता क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे स्मारक चौक, चिंचवड येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!