माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी; नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे आवाहन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
रहाटणी-काळेवाडी परिसरातील रस्त्यांची आरक्षणे तसेच सार्वजनिक सोयीसुविधांसाठी राखीव असलेल्या जागा तातडीने महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्यांचा विकास करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. आरक्षणाचा मोबदला घेऊनही काही जागा अडवून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, परिसराचा विकास रखडल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
रहाटणी-काळेवाडी परिसरातील अनेक रस्त्यांची आरक्षणे अद्याप विकसित झालेली नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांच्या आरक्षित जागा अडविण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. काळेवाडीतून पिंपरीकडे जाण्यासाठी नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रमाचा अपव्यय होत असून, वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनत आहे.
तापकीर यांनी तापकीर मळा ते पिंपरीगाव पूल, लकी बेकरी ते पिंपरीगाव तसेच राजवाडेनगर ते पिंपरी पूल या मार्गांवरील रस्त्यांचा विकास करण्याची मागणी केली आहे. हे रस्ते विकसित झाल्यास पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प आणि काळेवाडी परिसरातील नागरिकांना एम्पायर इस्टेट पुलाकडे जाणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच रहाटणी-काळेवाडीतील अंतर्गत रस्त्यांचा विकास झाल्यास वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल.
या परिसरातील १२ मीटर, ९ मीटर आणि ६ मीटर रुंदीच्या रस्त्यांची आरक्षित जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी. यासाठी ज्या नागरिकांच्या जमिनी बाधित होतील, त्यांना जमिनीच्या बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला देण्यात यावा, अशी भूमिका तापकीर यांनी मांडली आहे.
वाकड, रावेत, पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या भागांप्रमाणे रहाटणी-काळेवाडी परिसरातही नियोजनबद्ध रस्ते विकसित होणे आवश्यक आहे. चांगले रस्ते झाल्यास परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील, जमिनींच्या मूल्यामध्ये वाढ होईल आणि परिसर स्वच्छ, सुंदर व विकसित होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सार्वजनिक सोयीसुविधांसाठी महापालिकेने आरक्षित केलेल्या जागाही अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उद्याने, सार्वजनिक सुविधा आणि इतर विकासकामांना अडथळे निर्माण होत आहेत. आरक्षित जागा ताब्यात न घेतल्यामुळे रहाटणी-काळेवाडी परिसराचा नियोजित विकास रखडून हा भाग बकाल होत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यांची तसेच सार्वजनिक हिताच्या आरक्षणांची जागा तातडीने ताब्यात घ्यावी आणि विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी केली आहे.




Total Users : 243692