शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी प्राधिकरण ते तुळजाई वस्तीपासून आकुर्डी खंडोबा माळपर्यंतच्या नागरिकांना अनुप मोरे सोशल फाऊंडेशनच्या नवीन कार्यालयाचा लाभ होईल. ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘गुड गव्हर्नन्स’च्या धर्तीवर या नवीन कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला. तर, प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोरे परिवार म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी खात्रीच भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली.
निगडी प्राधिकरण येथे अनुप मोरे सोशल फाऊंडेशनच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते रविवारी (ता. २२) करण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ, माजी पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा सभापती कैलास कुटे, माजी नगरसेविका वृषाली मोरे, सुनील कदम, महेश काटे, सलीम शिकलगार, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष समीर मोरे, जयदीप खापरे,मनोज देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले, भाजपचे ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्वतः शेवटी’ हे ब्रीद असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘गुड गव्हर्नन्स’च्या धर्तीवर नवीन कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. नागरिकांना कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत. त्यांच्या प्रश्नांची तत्काळ किंवा निश्चित कालावधीत सोडवणूक झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अनुपदादा मोरे यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक
अनुपदादा मोरे यांनी भाजयुमोच्या माध्यमातून राज्यभर चांगले काम केले असून, आता त्यांच्यावर कामगार आघाडीची मोठी जबाबदारी आहे. लाखो कामगारांच्या पाठीशी ते उभे राहिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, आरोग्यविषयक कामे आणि शासकीय योजनांसाठी स्वतंत्र कक्ष व टीम तयार करावी. आगामी काळात आकुर्डी प्रभागातून भाजपचे चारही नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, असेही आमदार जगताप म्हणाले.
मतदारांच्या साथीमुळेच मेट्रो प्रवासाचे भाग्य
शहरातील विकासकामांचा उल्लेख करताना शिवाजीनगर-पिंपरी मेट्रो सुरू झाली असून, भक्ती-शक्तीपर्यंत विस्तार होणार आहे. भक्ती-शक्ती ते पुनावळे-वाकड-कोकणे चौकातून मोशीपर्यंत प्रस्तावित मेट्रो मार्गाचा डीपीआर शासनाकडे सादर केला आहे. पवना धरणातील गाळ काढणे, भामा-आसखेडमधून पाणी आणणे आणि मुळशी धरणातील १० टीएमसी पाण्यापैकी दोन टीएमसी पाणी पिंपरी-चिंचवडला मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविला. उर्वरित विकासकामे पूर्ण करण्याची ग्वाही आमदार जगताप यांनी दिली.
कार्यक्रमात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लता सोनवणे यांना भाजप महिला आघाडीच्या मंडल अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नबीलाल बिजली यांचाही सत्कार करण्यात आला. अविनाश नवले प्रास्ताविक केले, तर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष समीर मोरे यांनी आभार मानले.
मोरे परिवार सदैव नागरिकांच्या पाठीशी : अनुप मोरे
भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी या दोन्ही प्रभागांतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. २०१७ च्या निवडणुकीवेळी नागरिकांना चांगले काम करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार परिसरात कामे केली. मात्र, नागरिकांकडून नवीन कार्यालयाची मागणी सातत्याने होत होती. २०२६ मध्येही नागरिकांनी ही मागणी मांडली होती. निगडी प्राधिकरण आणि आकुर्डी गावठाण हे स्वतंत्र भाग असल्याने दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या प्रश्नांकडे स्वतंत्रपणे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून निगडी प्राधिकरणासह तुळजाई वस्ती, दत्तवाडी आणि विठ्ठलवाडी या दोन्ही प्रभागांतील नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील. परिस्थिती कोणतीही असो, मोरे परिवार सदैव नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, असा विश्वास अनुप मोरे यांनी व्यक्त केला.




Total Users : 243692