विधी समिती सभापती सुजाताताई बोराटे आणि आपला माणूस निलेश बोराटे यांच्या पुढाकारातून ४५० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप !
भोरगिरी, पाभे, भोमाळे आणि भिवे या दुर्गम आदिवासी भागांतील गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देत विधी समिती सभापती सुजाताताई बोराटे आणि आपला माणूस तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या पुढाकारातून तब्बल ४५० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा !’ या सामाजिक उपक्रमांतर्गत हा मदतकार्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
वाढदिवस साजरा करताना होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच पैशातून समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदत करावी, या सामाजिक विचारातून आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुजाताताई बोराटे आणि निलेश बोराटे यांनी पुढाकार घेत भोरगिरी, पाभे, भोमाळे आणि भिवे या गावांतील गरजू कुटुंबांना एकूण ४५० किटचे वाटप केले. या किटमध्ये कुटुंबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन धान्य, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता.
आदिवासी आणि दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना आजही दैनंदिन गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत महिनाभराच्या गरजा भागविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळाल्याने संबंधित कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यासाठी सुजाताताई बोराटे आणि निलेश बोराटे यांनी घेतलेला पुढाकार या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासी गावांपर्यंत मदत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असून, सामाजिक सहभागातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे.
“समाजातील गरजू आणि आदिवासी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष कृती करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमातून दुर्गम भागातील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. ४५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरित करताना विशेष समाधान वाटले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांत सहभागी राहू.”
— सुजाताताई बोराटे, विधी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेविका
“आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुजाताई बोराटे यांच्या सहकार्याने भोरगिरी, पाभे, भोमाळे आणि भिवे या आदिवासी गावांतील गरजू कुटुंबांना ४५० जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, हाच या उपक्रमामागील प्रामाणिक हेतू आहे. यापुढेही गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांत सातत्याने योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
— निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते




Total Users : 242838