spot_img
spot_img
spot_img

मटण दुकानांमध्ये मटणाचे प्रदर्शन न करताच विक्री व्हावी; यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी – अभिषेक बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहरातील सर्व मटण दुकानांमध्ये मटणाचे उघड्यावर प्रदर्शन न करता, समोरून योग्य आच्छादन किंवा पडदे लावून आतल्या पद्धतीनेच मटणाची विक्री व्हावी, अशी स्पष्ट व ठाम भूमिका स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडली. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठ दिवसांत सादर करून तो स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी आणला जाईल, तसेच प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिका ​सर्वसाधारण सभेत शहरातील नागरी प्रश्न, स्वच्छता आणि प्रशासकीय कामकाजावर बोलताना बारणे यांनी विविध मुद्द्यांकडे सभागृहाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.

शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांलगतच्या मटण दुकानांसमोर उघड्यावर होणाऱ्या प्रदर्शनामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेता, सर्व दुकानांवर समोरून आच्छादन लावून आतल्या आत व्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या विषयावर पुढील आठ दिवसांत प्रशासनाकडून अहवाल मागवून तो स्थायी समितीपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवला जाईल. त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही विलंब न लावता तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

​केवळ मटण दुकानांचाच विषय नव्हे, तर संपूर्ण शहराची स्वच्छता, सुंदरता आणि राहण्यायोग्य वातावरण टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी या दोन चाकांनी समन्वयाने चालणे आवश्यक असल्याचे बारणे यांनी अधोरेखित केले. गेल्या दहा-पंधरा दिवसांत पाच-सहा प्रभागांतील क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या भेटींचा संदर्भ देत त्यांनी प्रशासकीय पातळीवरील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले. प्रत्येक प्रभागात एक उपअभियंता आणि त्यांच्याअंतर्गत तीन कनिष्ठ अभियंते कार्यरत असताना, त्यांनी संबंधित नगरसेवकांसोबत दर आठवड्याला एकत्र बसून रुग्णालय, प्रशासकीय इमारती, उद्याने, क्रीडांगणे, रस्ते आणि पदपथांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली.

​अर्थसंकल्प पुस्तिकेत देखभाल-दुरुस्तीच्या आसपासची सुमारे सातशे कामे समाविष्ट असताना, त्यापैकी केवळ साडेतीनशे ते चारशे कामेच आता प्रसिद्ध झाल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली. देखभाल-दुरुस्ती आणि वसुलीची कामे नियमितपणे होणे आवश्यक असून, साप्ताहिक बैठकीत दिलेल्या सूचना खालच्या स्तरापर्यंत योग्य प्रकारे पाळल्या जातात की नाही, याची खात्री प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी सुचवले. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित शहर देण्यासाठी मटण विक्रीच्या नियमांपासून ते प्रभाग स्तरावरील मूलभूत सुविधांपर्यंत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

​“शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीसाठी सर्व मटण दुकानांमध्ये उघड्यावर प्रदर्शन न करता, समोरून आच्छादन लावून आतल्या पद्धतीनेच विक्री व्हायला हवी, अशी आमची ठाम भूमिका आहे. याबाबत पुढील आठ दिवसांत याचा अहवाल स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, तसेच प्रभाग स्तरावरील देखभाल-दुरुस्ती, मूलभूत सुविधा आणि मोशी कचरा व पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबतही स्पष्ट व जबाबदारीने पावले उचलावीत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांनी समन्वयाने काम केल्यास शहराचा कारभार अधिक गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल.”

— अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!