शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या विविध समस्यांवर नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी आक्रमक भूमिका मांडली. दुर्गा टेकडी परिसरातील प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला विरोध, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी आणि चिकन वेस्ट वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
दुर्गा टेकडी आणि परिसरातील पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेत, यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवू नये, अशी ठाम मागणी तरस यांनी केली. विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील कचरा व्यवस्थापनाच्या दयनीय परिस्थितीवरही बोट ठेवले. एका बाजूला परिसरात कचऱ्याची समस्या कायम असताना दुसरीकडे शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळतो, या विसंगतीकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. स्वच्छतेच्या पुरस्काराबद्दल महापौरांचे अभिनंदन करतानाच पुरस्कार आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच चिकन वेस्टची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर कचरा सांडत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत आहे. अशा बेजबाबदार वाहतूक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणीही त्यांनी केली.




Total Users : 242838