शबनम न्यूज | प्रतिनिधी
वारंवार कचरा साठणारी ठिकाणे (गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट – GVP) स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच उपक्रमांतर्गत ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २० मधील डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, फुलेनगर येथील वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणाचे टाकाऊ वस्तूंच्या कल्पक आणि कलात्मक पुनर्वापरातून आकर्षक स्थळात रूपांतर करण्यात आले आहे. कल्पकतेचा स्पर्श आणि सौंदर्यदृष्टीची जोड देत निरुपयोगी वस्तूंना नवे रूप बहाल करण्यात आले असून, कचऱ्याच्या जागी सौंदर्याची नवी निर्मिती साकारली आहे. या अभिनव उपक्रमातून परिसराचे रूपडे पालटण्यासोबतच पुनर्वापराचे महत्त्व आणि स्वच्छतेचा संदेशही त्यानिमित्ताने देण्यात येत आहे.
यापरिसरात यापूर्वी कचरा टाकला जात असलेल्या ठिकाणी विविध टाकाऊ वस्तूंचा सुबक आणि कलात्मक पद्धतीने वापर करण्यात आला. त्यामुळे केवळ परिसराचे सौंदर्यीकरण झाले नाही, तर कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि सार्वजनिक स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. कचरा टाकण्याच्या ठिकाणाचे सुशोभीकरण करून त्याचे सकारात्मक आणि आकर्षक जागेत रूपांतर करण्याचा हा उपक्रम विशेष ठरत आहे.
याबाबत महापौर रवि लांडगे म्हणाले, “शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पुनर्वापर करून वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे सुशोभीकरण करणे हा पर्यावरणपूरक आणि अभिनव उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेसोबतच पुनर्वापराची संस्कृती विकसित होण्यास मदत होईल.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांचे कायमस्वरूपी स्वरूपात रूपांतर करण्यासाठी केवळ स्वच्छता पुरेशी नाही, तर त्या ठिकाणांचा सकारात्मक वापर आणि सौंदर्यीकरणही महत्त्वाचे आहे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून अशा जागांचे आकर्षक रूपांतर केल्यास नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण होईल. शहरातील इतर वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणी अशा नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यावर भर देण्यात येत आहे.”
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “वारंवार कचरा साठणाऱ्या ठिकाणांवर पुन्हा कचरा साचू नये, यासाठी परिसराचे सुशोभीकरण, नियमित स्वच्छता आणि नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. टाकाऊ वस्तूंच्या कलात्मक पुनर्वापरातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविता येतो. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे.”
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसदस्या वर्षा जगताप, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे तसेच महापालिकेचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टाकाऊ वस्तूंमधून साकारलेले हे सौंदर्यपूर्ण परिवर्तन शहरातील स्वच्छता मोहिमेला नवी दिशा देणारे ठरत आहे.




Total Users : 240427