कामाच्या दर्जाशी तडजोड न करता निर्धारित वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आमदार शंकर जगताप यांच्या विकास निधीतून पुनावळे येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात सभा मंडपाचे बांधकाम सुरू असून, या विकासकामाचा दर्जा आणि प्रगती यांची प्रत्यक्ष पाहणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव नवनाथ ढवळे यांनी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून श्री खंडोबा मंदिराचे विश्वस्त तसेच संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. सभा मंडपाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारे व्हावे, यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभा मंडपाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बांधकामात गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका नवनाथ ढवळे यांनी यावेळी मांडली.

तसेच, बांधकामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सभा मंडपाचे काम निर्धारित वेळेत आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करून ते भाविकांच्या सेवेसाठी खुले करावे, अशा सूचनाही त्यांनी ठेकेदाराला दिल्या.
आमदार शंकर जगताप यांच्या विकास निधीतून परिसरात विविध विकासकामांना चालना मिळत असून, मंजूर झालेली कामे प्रत्यक्षात दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. विकासकामे केवळ मंजूर करून चालत नाहीत, तर त्यांची नियमित पाहणी, गुणवत्तेवर लक्ष आणि वेळेत पूर्तता होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या पाहणीच्या माध्यमातून देण्यात आला.




Total Users : 240447