शबनम न्यूज | प्रतिनिधी
बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संरक्षक जाळी, सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट यांसारखी साधने उपलब्ध करून न देता कामाला लावल्याने चौथ्या मजल्यावरून पडून एका २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना माण येथील संत तुकारामनगर परिसरात घडली. याप्रकरणी बांधकाम साइटचा मालक आणि ठेकेदार अशा दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शिवदर्शन बिराजदार (पोलीस हवालदार हिंजवडी पोलीस ठाणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
संतोष माणिक राठोड (वय ३८, बांधकाम व्यावसायिक, रा. स्वप्ननगरी कॉलनी, राजवाडेनगर, काळेवाडी, पुणे; बांधकाम साइट मालक) आणि अमोल दिलीप चव्हाण (वय ३९, बांधकाम व्यावसायिक, रा. साखरेवस्ती, हिंजवडी, पुणे; ठेकेदार) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकारामनगर, माण येथील सर्व्हे क्रमांक ९/२ मधील बांधकाम साइटवर ही दुर्घटना घडली. संबंधित बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक जाळी लावण्यात आली नव्हती. तसेच कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि इतर आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात आली नव्हती. काम करताना कामगार खाली पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही साइट मालक संतोष राठोड आणि ठेकेदार अमोल चव्हाण यांनी सुरक्षेची योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप आहे.
त्यांनी महेश रामराव राठोड (वय २३, रा. लोंढे वस्ती, डांगे चौक, पुणे) याला कामासाठी साइटवर बोलावले होते. चौथ्या मजल्यावर मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिनी क्रेनला ट्रॉली लावत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वांगणेकर करीत आहेत.




Total Users : 240189