spot_img
spot_img
spot_img

वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील पोस्ट ऑफिस सेवांसाठी राहुल कलाटे यांचा पाठपुरावा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील वाढते नागरीकरण आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, भारत सरकारकडून मंजूर झालेल्या पुनावळे आणि ताथवडे सब-पोस्ट ऑफिससाठी महापालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

भारत सरकारकडून पुनावळे आणि ताथवडे येथे सब-पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहेत. पुनावळे पोस्ट ऑफिससाठी ४११०८६, तर ताथवडे पोस्ट ऑफिससाठी ४११०८७ हा स्वतंत्र पिनकोड निश्चित करण्यात आला आहे. तसेच वाकड परिसरासाठी ४११०८८ हा स्वतंत्र पिनकोड देण्यात आला आहे. या स्वतंत्र पिनकोडच्या अनुषंगाने संबंधित भागांमध्ये स्वतंत्र टपाल कार्यालयांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरत आहे.

मात्र, पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी महापालिकेने उपलब्ध जागेचा विचार करून संबंधित पोस्ट ऑफिस विभागाला अल्पदरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राहुल कलाटे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

या परिसरातील नागरिकांना टपाल कार्यालयाशी संबंधित कामांसाठी इतर भागांत जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवरच टपाल सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आणि वाकड – ताथवडे – पुनावळे भागातील टपाल सेवा अधिक सुलभ आणि सक्षम करण्यासाठी नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन नागरिकांना त्यांच्या परिसरातच टपाल सेवा, आर्थिक व्यवहार आणि इतर पोस्ट ऑफिस सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुनावळे व ताथवडे येथील मंजूर पोस्ट ऑफिस लवकरात लवकर कार्यान्वित व्हावीत आणि वाकड परिसरातील टपाल सेवाही अधिक सक्षम व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!