spot_img
spot_img
spot_img

लोकनेत्याच्या वाढदिनी लोकसेवेचा यज्ञ; तब्बल५१ आदिवासी- दुष्काळग्रस्त गावांना माणुसकीचा आधार!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचे फलक, मोठमोठे होर्डिंग, हार-तुरे, सत्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या पारंपरिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘लोकनेत्याच्या वाढदिनी लोकसेवेचा यज्ञ’ या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी गावांमधील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडच्या वतीने केला आहे.

‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि आदिवासी पट्ट्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याची मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आमदार महेश लांडगे यांचा २७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी, शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर किंवा होर्डिंग न लावता त्यासाठी होणारा खर्च गरजूंच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा आनंद केवळ कार्यकर्ते आणि समर्थकांपुरता मर्यादित न ठेवता समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक तथा भाजपाचे सरचिटणीस विकास डोळस आणि संजय पटणी यांनी दिली.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित घोडके, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, उपक्रमाचे समन्वयक तथा सरचिटणीस विकास डोळस, सरचिटणीस मधुकर बच्चे, सरचिटणीस संजय पटनी, नगरसेवक निलेश नेवाळे, क प्रभाग अध्यक्ष निखिल बोराडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, हितचिंतक आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.

‘एक नगरसेवक, एक गाव’ संकल्पनेतून मदतीचे नियोजन

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील ५१ आदिवासीपट्ट्यातील गावांची निवड करण्यात आली आहे. ‘एक नगरसेवक, एक गाव’ या संकल्पनेनुसार भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक किंवा नगरसेविकेकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित गावातील गरजू कुटुंबांची माहिती संकलित करणे, आवश्यक साहित्याचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष मदतवाटपाची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधी आणि समन्वयक पार पाडणार आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयामार्फत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र समन्वयक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक गरजू कुटुंबाला किमान एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत संबंधित गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन मदतवाटप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

वाढदिवसाच्या खर्चातून गरजूंच्या घरात अन्नधान्य!

वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्या निधीचा समाजोपयोगी कामासाठी विनियोग करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. शुभेच्छांचे फलक, जाहिराती, सत्कार, सजावट आणि अन्य कार्यक्रमांवरील खर्च टाळून त्याऐवजी गरजू कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतकांना करण्यात आले आहे. या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाढदिवस साजरा करण्याच्या प्रचलित पद्धतीला विधायक पर्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावागावांत मदत पोहोचविण्याबरोबरच समाजातील दानशूर व्यक्तींनाही सेवाकार्यात सहभागी करून घेण्याचा मानस आहे.

डिसेंबर २०२६ मध्ये मदतीचा दुसरा टप्पा

या उपक्रमाची व्याप्ती केवळ ५१ गावांपुरती मर्यादित राहणार नाही. डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सामाजिक संस्था, उद्योजक, व्यापारी, दानशूर व्यक्ती आणि नागरिकांच्या लोकसहभागातून आणखी दुष्काळग्रस्त गावांमध्ये मदतकार्य राबविण्याचे नियोजन आहे. उपक्रमांतर्गत मदत मिळालेल्या गावांची नावे, लाभार्थी कुटुंबांची संख्या, वितरित साहित्याचा तपशील, छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा स्वतंत्र अहवाल तयार करून भाजपा प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे मदतकार्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ यांची नोंद ठेवली जाणार आहे.

“माझ्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठमोठे होर्डिंग लागावेत, हार-तुरे आणि सत्कार व्हावेत, यापेक्षा एखाद्या गरजू कुटुंबाच्या घरात महिनाभराची अन्नधान्याची व्यवस्था व्हावी, हे माझ्यासाठी अधिक समाधानाचे आहे. समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड समाजसेवेतूनच झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५१ आदिवासी गावांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. राजकारण हे केवळ निवडणुका आणि सत्तेपुरते मर्यादित नसून समाजातील शेवटच्या घटकाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे प्रभावी माध्यम आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या माणुसकीच्या यज्ञात सहभागी व्हावे, हीच माझी अपेक्षा आहे.”

– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड पुणे.

“आमदार महेशदादा लांडगे यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड देत पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ‘एक नगरसेवक, एक गाव’ ही केवळ घोषणा नसून प्रत्यक्ष कृतीतून लोकसेवा करण्याचा संकल्प आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरातून आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील गरजू कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे जाणे, ही सामाजिक एकात्मतेची भावना अधिक बळकट करणारी बाब आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाल्याने कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. शहर भाजपाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक निवडलेल्या गावातील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहेत. सेवाभाव हीच भारतीय जनता पार्टीच्या कार्याची खरी ओळख आहे.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!