शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ या पर्यावरणपूरक उपक्रमाची संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत (United Nations Framework Convention on Climate Change – UNFCCC COP31) दखल घेण्यात आली आहे. तुर्कीये येथील अंटाल्या शहरातील अंटाल्या एक्स्पो सेंटर येथे ९ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची जागतिक स्तरावर दखल घेतली जाणे, ही पिंपरी चिंचवडसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
जागतिक स्तरावर हवामान बदलाचे वाढते आव्हान, पर्यावरणाचे संवर्धन आणि शाश्वत विकास या विषयांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध देश, संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था पर्यावरणपूरक विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेतही अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण आणि त्यावर चर्चा करण्यात येत आहे. याच व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचा समावेश होणे, ही शहराच्या पर्यावरणपूरक विकासाच्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय पोहोच आहे.
युरोपमध्ये सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्येही ‘हरित सेतू’ प्रकल्पाची चर्चा करण्यात आली. भारतामध्ये जगाला हेवा वाटावा असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवड महापालिकेनेही पुढाकार घेतल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरणपूरक प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाला मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल ही शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली नवी ओळख असून, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीसाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये पिंपरीचिंचवडचा सक्रिय सहभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असते. शहरात गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजन आणि अंमलबजावणीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. तसेच केंद्र शासनाच्या ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ या उपक्रमामध्ये देशातील १०० शहरांमधून पिंपरी चिंचवड शहराने पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले होते. या उपक्रमात शहराने वैयक्तिक स्तरावरही विक्रम नोंदवला आहे.
स्मार्ट सिटी आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये बापूसाहेब गायकवाड, सुनील पवार, अमित दीक्षित, स्वप्नील शिर्के, अनंत चिटके, प्रसाद देशमुख आदी अधिकाऱ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा विविध उपक्रमांमधील सहभागातून पिंपरी चिंचवड शहर पर्यावरणपूरक, शाश्वत आणि नावीन्यपूर्ण विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा प्रवास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून पर्यावरणाचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत शहर निर्माण करण्याचाही आहे. महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत कौतुक होणे, ही संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. स्थानिक पातळीवर राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळणे, ही शहराच्या विकासासाठी प्रेरणादायी बाब आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अशा उपक्रमांना महापालिकेच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड शहराचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिका शहराच्या विकासासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाची संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत दखल घेतली जाणे, ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. स्थानिक पातळीवर राबविण्यात येणारे उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचत असल्याने अशा प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल.
. डॉ.विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये पर्यावरणाचा समतोल राखणे आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून उपक्रमांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या कामांना जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्यामुळे अशा उपक्रमांची उपयुक्तता आणि व्याप्ती अधिक व्यापक करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
– बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका




Total Users : 239473