महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणाऱ्या नामकरणावर भाऊसाहेब भोईर यांचा तीव्र आक्षेप; चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द वगळून चित्रपटाचे नाव बदलण्यात यावे, अशी ठाम मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणेकडे निवेदन सादर करून चित्रपटाच्या शीर्षकाबाबत तीव्र आक्षेप नोंदविला आहे.
‘महाराष्ट्र’ हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे, राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाचे, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समतावादी विचारांचे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. संत, समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारकांच्या योगदानातून महाराष्ट्राने देशाला समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा आदर्श दिला आहे. अशा गौरवशाली राज्याचे नाव एखाद्या विशिष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित विषयाच्या शीर्षकाशी जोडणे योग्य नसल्याचे भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचार, शोषण, अंधश्रद्धा आणि समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करून जनजागृती करण्याचे प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहेत. मात्र, अशा विषयाला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नाव जोडल्याने राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे चित्रपटाच्या आशयाला विरोध नसून शीर्षकातील ‘महाराष्ट्र’ या शब्दाला आक्षेप असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करत असतानाच मराठी भाषा, साहित्य, नाट्यकला आणि संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारीही आपण पार पाडत असल्याचे भोईर यांनी नमूद केले. साहित्य, नाटक आणि चित्रपट ही केवळ मनोरंजनाची साधने नसून समाजमन घडविणारी आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारी प्रभावी माध्यमे आहेत. त्यामुळे कलात्मक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखतानाच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा आणि जनभावनांचाही सन्मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का न पोहोचवता चित्रपटाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शीर्षक बदलण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे. या मागणीमुळे प्रस्तावित चित्रपटाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.




Total Users : 238902