शबनम न्यूज | प्रतिनिधी
संगीतप्रेमी रसिकांसाठी जुन्या-नव्या लोकप्रिय गीतांची सुरेल मेजवानी घेऊन ‘आनंद-यात्री’ या भव्य संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड, पुणे येथे हा संगीत सोहळा रंगणार आहे.
आनंद-यात्री परिवारातील सर्व गायकांच्या सहभागातून साकार होणाऱ्या या कार्यक्रमाचे सादरीकरण डॉ. अविनाश देविदास देशपांडे यांच्या संकल्पनेतून करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार उमा खापरे उपस्थित राहणार आहेत. त्या विधानपरिषदेच्या सदस्य असून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतात.
या संगीत मैफलीचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल १८ गायकांचा सहभाग, जुन्या-नव्या गाण्यांचा सुरेल संगम आणि १० बाय १६ फूट आकाराच्या भव्य एलईडी सिनेमॅटिक स्क्रीनवर सादर होणारा खास दृश्यानुभव. त्यामुळे रसिकांना संगीतासोबतच एक वेगळा मनोरंजनात्मक अनुभव घेता येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता आणि रुपाली करणार असून, लिटिल चॅम्प प्रिन्सी हिचे विशेष आकर्षण रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. डॉ. संजय, डॉ. प्रशांत, श्रीकांत, राजेंद्र, राहुल, मंदार, डॉ. पराग, पंकज, ओंकार, डॉ. जसप्रीत, अदिती, भाग्यश्री, डॉ. वसुंधरा, रश्मी, श्रेया, आरती, सोनल के. आणि अंजिता आदी गायक कलाकार आपल्या सुरेल गायनाने मैफलीत रंगत आणणार आहेत.
विशेष म्हणजे, सर्व रसिकांसाठी या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.
संगीत, सुरेल आवाज, लोकप्रिय गीते आणि भव्य सादरीकरण यांचा अनोखा संगम असलेल्या या ‘आनंद-यात्री’ संगीत सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त आनंद-यात्री परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




Total Users : 238734