spot_img
spot_img
spot_img

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ नाव वगळा!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा अपमान असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आक्षेप; शहराध्यक्ष प्रविण कदम यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या नावाची सांगड लैंगिक शोषणासारख्या गंभीर आणि निंदनीय प्रकरणाशी घालणे अनुचित असल्याचा आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने प्रस्तावित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हे नाव वगळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रविण कदम यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकाबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील लैंगिक शोषणासारख्या विकृत प्रवृत्तीवर भाष्य करून जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. मात्र, अशा गंभीर आणि निंदनीय प्रकरणाशी महाराष्ट्र या राज्याच्या नावाची सांगड घालणे म्हणजे राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अस्मितेला धक्का देण्यासारखे असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने मांडली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या भोंदू आणि विकृत प्रवृत्ती निर्माण होणे ही दुर्दैवी बाब आहे. खरात प्रकरणासारख्या घटनांमधून महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींना आळा घालण्यासाठी समाजप्रबोधन, जनजागृती आणि दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती स्वाभिमान, शौर्य, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांची भूमी आहे. संतांची परंपरा, शूरवीरांचा इतिहास, समाजसुधारकांचे कार्य आणि परिवर्तनवादी विचारांनी महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या भूमीने देशाला सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट गुन्हेगारी आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणाशी संबंधित चित्रपटाला ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ असे नाव देऊन राज्याच्या नावाचा वापर करणे अनावश्यक आणि आक्षेपार्ह असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडने चित्रपट निर्मितीच्या स्वातंत्र्याला किंवा अभिव्यक्तिस्वातंत्र्याला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करताना एखाद्या राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचाही विचार होणे आवश्यक आहे. समाजातील विकृती उघड करण्यासाठी चित्रपटाची निर्मिती होत असेल, तर त्यासाठी महाराष्ट्राच्या नावाचा वापर करण्याची आवश्यकता काय, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

या निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडने प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या प्रस्तावित चित्रपटाच्या शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हे नाव तातडीने वगळण्यात यावे. चित्रपटाच्या कथानकाशी महाराष्ट्र राज्याचे नाव जोडण्यामागील कारणांची तपासणी करण्यात यावी. राज्याच्या नावाचा अनावश्यक वापर टाळून चित्रपटासाठी पर्यायी शीर्षक निश्चित करण्याचे निर्देश संबंधित निर्माते व दिग्दर्शकांना द्यावेत. तसेच या निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या नावाचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सामाजिक विकृतींवर प्रहार करण्यासाठी चित्रपटांची निर्मिती व्हावी; मात्र त्यासाठी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि वैचारिक अस्मितेला जोडण्याची गरज नाही, अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडने या निवेदनातून मांडली आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम, संघटक वैभव गजधने, विनोद माने, चिंचवड विभागाध्यक्ष श्याम पाटील आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!