निगडी टिळक चौकात पाणी रस्त्यावर; वाहतुकीला अडथळा, महामेट्रोच्या ठेकेदारावर कारवाईची मनसेची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महामेट्रोच्या कामातील निष्काळजीपणाचा फटका पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडकरांना बसला आहे. निगडीतील टिळक चौक आणि निगडी बसस्थानक परिसरात मेट्रोच्या पिलरचे काम सुरू असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. ऐन वर्दळीच्या परिसरात पाण्याचे मोठे लोट साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेला महामेट्रोच्या ठेकेदाराची निष्काळजी कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निगडीतील टिळक चौक परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून महामेट्रोच्या पिलर उभारणीचे काम सुरू आहे. या कामादरम्यान परिसरातून जाणारी महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात येत आहे. जलवाहिनी फुटल्याने मोठ्या दाबाने पाणी रस्त्यावर वाहू लागले. परिणामी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आधीच शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि पाण्याची बचत महत्त्वाची असताना अशा प्रकारे मुख्य जलवाहिनी फुटून पाणी वाया जाणे ही गंभीर बाब असल्याचे मनसेने म्हटले आहे.
विशेष म्हणजे, महामेट्रोच्या कामादरम्यान यापूर्वीही अशाच प्रकारच्या चार ते पाच घटना घडल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. वारंवार जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविताना शहरातील अस्तित्वातील पाणीपुरवठा वाहिन्या, रस्ते आणि नागरी सुविधांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, कामाच्या नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना वारंवार गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण मंदिरासमोरील रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. पाईपलाईनच्या कामासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून हा रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
या गंभीर समस्येबाबत मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले आणि प्रथम महिला नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि कामात निष्काळजी करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मनसेकडून तक्रार करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, वारंवार अशा घटना घडत असताना केवळ दुरुस्ती करून प्रश्न सुटणार नाही. मेट्रोच्या कामादरम्यान भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ठेकेदाराला जबाबदार धरून कामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश देणे आवश्यक आहे, अशी भूमिका मनसेने मांडली आहे.




Total Users : 238467