spot_img
spot_img
spot_img

थेरगावात अनधिकृत मोबाईल टॉवरला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळीच्या सणाचा उत्साह आणि लक्ष्मीपूजनाचा आनंद सुरू असतानाच थेरगाव परिसरात मोबाईल टॉवरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. केलास नगर, लेन क्रमांक २ येथील भोसले बिल्डिंगवर उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरला रविवारी (दि. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध होण्यापूर्वीच परिसरातील तीन नागरिकांनी धाडस दाखवत आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला. राकेश जाधव, राजू यादव आणि मलंग शेख यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणली. त्यांच्या या धाडसामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, केलास नगर लेन क्रमांक २ मधील भोसले बिल्डिंग या दोन मजली इमारतीवर मोबाईल टॉवर बसविण्यात आला आहे. याच टॉवरला रात्री अचानक आग लागली. आगीचे स्वरूप पाहता ती इमारतीपर्यंत पसरण्याची भीती निर्माण झाली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

या वेळी अग्निशमन दलाची गाडी तातडीने उपलब्ध नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राकेश जाधव, राजू यादव आणि मलंग शेख यांनी स्वतः पुढाकार घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. कोणतीही मदत येण्याची वाट न पाहता त्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही अथवा जीवितहानी झाली नाही. मात्र, या तिघांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिक नागरिकांचा पूर्वीपासून विरोध असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र, विरोध आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करून टॉवर उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, या इमारतीवर यापूर्वीही दोन अन्य टॉवर बसविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकाच इमारतीवर अनेक मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी कोणी दिली? हे टॉवर अधिकृत आहेत का? इमारतीची संरचनात्मक क्षमता तपासण्यात आली होती का? तसेच अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागरिकांनी विरोध करूनही आणि महापालिकेकडे तक्रारी करूनही या टॉवरची उभारणी कशी झाली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. आता टॉवरला आग लागल्यानंतर तरी महापालिका प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!