शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील साई मेरीगोल्ड सोसायटीमधील ए-७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट नसले तरी प्राप्त माहितीनुसार, बाल्कनीतून सुरू झालेली आग काही वेळातच घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी, टीव्ही आणि इतर साहित्यापर्यंत पसरली.
याच दरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवानांनी नागरिकांची सुखरूप सुटका करून पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही.
सदर घटनेत एसी कॉम्प्रेसर, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरी, विद्युत वायरिंग तसेच इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाले. विशेषतः एसी कॉम्प्रेसर आणि टीव्हीला भीषण आग लागली होती.
घटनेची वर्दी मिळताच रहाटणी उप अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहरूनगर अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील पथकांचीही मदत घेण्यात आली. अग्निशमन जवानांनी होजरील होज आणि होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून फ्लॅटमधील आग विझविण्याची कार्यवाही केली.
आग पूर्णपणे विझविल्यानंतर जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरात पुन्हा आग लागण्याचा किंवा अन्य कोणताही धोका नसल्याची खात्री करून अग्निशमन दलाने घटनास्थळ सोडले. या घटनेत फ्लॅटमधील साहित्याचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. गॅस गळतीचा संशय आल्यास विद्युत स्विच सुरू किंवा बंद करू नयेत, आग किंवा ठिणगी निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये. गॅसचा मुख्य व्हॉल्व्ह सुरक्षितपणे बंद करून दरवाजे व खिडक्या उघडाव्यात आणि तातडीने अग्निशमन विभागाशी १०१ किंवा ७०३०१०८९९१ (मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी) या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.




Total Users : 237888