शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिवाळीच्या आनंदापासून समाजातील कोणतेही कुटुंब वंचित राहू नये, या भावनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने खरोशी गावातील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळावा, यासाठी अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, भोसरी विधानसभा यांच्या सहकार्याने ‘एक हात मदतीचा’ हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवाळीच्या तयारीत घरखर्चाची जुळवाजुळव करताना अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन अन्नधान्याच्या स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मदतीमुळे संबंधित कुटुंबांच्या घरखर्चाला काही प्रमाणात हातभार लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या विचारातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सामाजिक संस्था, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
या उपक्रमाप्रसंगी खरोशी गावच्या सरपंच रोहिणी लांघी, उपसरपंच गोरक्ष कौदरे, माजी सरपंच भोलेनाथ कौदरे, पोलीस पाटील नवनाथ कौदरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन कौदरे, राजाराम कौदरे, नेताजी लांघी, पंढरीनाथ शिर्के, नितीन कौदरे, बाळासाहेब शिर्के, सीमा कौदरे, सुजाता कौदरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
तसेच, मुकुल माधव फाउंडेशन व उडान फाउंडेशनच्या वतीने डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विकास डोळस, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, मंडलाध्यक्ष शिवराज लांडगे, रामदास कुटे, प्रमोद परदेशी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी ऋषिकेश भालेकर आणि प्रकाश चौधरी यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घरात दिवे लावण्याचा सण नाही, तर अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याची संधी आहे. याच सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाने गरजू कुटुंबांना मदतीचा आधार देण्याबरोबरच समाजातील परस्पर सहकार्य आणि माणुसकीची भावना अधोरेखित केली.
आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे ही केवळ सामाजिक संस्थांची जबाबदारी नसून लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रत्येक सक्षम घटकाचे कर्तव्य आहे. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून हीच भावना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सणासुदीच्या काळात गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“दिवाळी सगळ्यांची आहे. आपल्या घरात सणाची तयारी करताना अडचणीत असलेल्या कुटुंबांचाही विचार केला पाहिजे. खरोशीतील कुटुंबांना अन्नधान्य देऊन त्यांच्या घरखर्चाचा थोडा भार हलका करण्याचा प्रयत्न आम्ही केला. ‘एक हात मदतीचा’ ही भावना सणापुरती मर्यादित राहू नये. जेव्हा गरज असेल, तेव्हा लोकांच्या पाठीशी उभं राहणं, ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, भोसरी विधानसभा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




Total Users : 237224