spot_img
spot_img
spot_img

ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते बिभीषण चौधरी यांची भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या विश्वासाला मिळाली निष्ठेच्या कार्याची पोचपावती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अनेक वर्षांपासून सातत्याने योगदान देणारे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते बिभीषण चौधरी यांची भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक, संघटनात्मक आणि राजकीय कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

बिभीषण चौधरी हे पक्ष संघटनेशी एकनिष्ठ राहून कार्यकर्त्यांची फळी उभी करणारे, सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. कामाप्रती निष्ठा, सेवाभाव, समर्पण आणि संघटनात्मक कामातील धडाडी ही त्यांच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अनेक वर्षे विविध स्तरांवर स्वयंसेवक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील विविध संस्था, मंडळे तसेच संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मंडल अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि शहर सचिव अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागातील स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे, नव्या कार्यकर्त्यांची जडणघडण करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणे, यावर चौधरी यांनी नेहमीच भर दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार शंकरभाऊ जगताप यांनी वेळोवेळी त्यांना पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनीही पक्ष संघटनेची जाण असलेल्या आणि दीर्घकाळ पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत चौधरी यांच्यावर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीबद्दल बिभीषण चौधरी यांनी आमदार शंकरभाऊ जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांचे आभार मानले. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून संघटनात्मक वाढीसाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एका ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्याच्या प्रदीर्घ कार्याची दखल घेत मिळालेली ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या संघटनात्मक योगदानाला मिळालेली महत्त्वपूर्ण पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!