spot_img
spot_img
spot_img

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे संवेदनशील स्थळांवर विशेष लक्ष

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा, तसेच सणाच्या कालावधीत आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या विशेष मोहिमेचे नेतृत्व उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले व श्रीकांत वैरागर करत असून सदर मोहिमेसाठी अग्निशमन विभागाचे २५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच २० मोठी अग्निशमन वाहने आणि ७ ते ८ वाहनांच्या माध्यमातून शहरभर गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील गर्दीची ठिकाणे, संवेदनशील परिसर आणि आगीच्या घटना घडण्याची शक्यता असलेल्या सुमारे २२ स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या कालावधीत फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई, दिव्यांचा वापर तसेच बाजारपेठांमधील वाढती गर्दी यामुळे आग लागण्याच्या घटनांची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मागील वर्षी दिवाळीदरम्यान आगीच्या सुमारे ७० घटना घडल्या होत्या. या घटनांचा अभ्यास करून संभाव्य धोके लक्षात घेण्यात आले असून, त्यानुसार शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून विशेष लक्ष ठेवण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

अग्निशमन विभागातील सर्व कर्मचारी दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून, शहरातील अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे. शहरात नियमित गस्त घालण्यासाठी लहान अग्निशमन वाहने तसेच आग लागल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रित करण्यासाठी मोठी वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.

शहरातील शगुन चौक, फुगेवाडी, पिंपळे गुरव, लांडगे नाट्यगृह परिसर, मॅगझिन चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, चिंचवड लिंक रोड, वाकड, दत्त मंदिर रस्ता, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत आणि मुकाई चौक यांसह शहरातील विविध संवेदनशील स्थळांवर अग्निशमन विभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या परिसरांमध्ये नियमित गस्त, परिस्थितीचा आढावा आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घ्यावयाची अग्निसुरक्षेची काळजी:

दिवाळीच्या काळात आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

– गर्दीच्या भागात, इमारतींच्या जवळ किंवा वाहनांच्या आसपास फटाके फोडू नयेत.
– फटाका पेटवल्यानंतर तो न फुटल्यास पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये.
– नायलॉन किंवा सिंथेटिक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत.
– ज्वलनशील वस्तू, गॅस सिलिंडर, विद्युत तारा तसेच पेट्रोल किंवा डिझेलच्या जवळ फटाके फोडू नयेत.
– फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखावे आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी.
– ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी फटाके उडवू नयेत.
– फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली किंवा अग्निसुरक्षेसाठी आवश्यक साधने ठेवावीत.
– फटाक्यांचा साठा घरात, वाहनांमध्ये किंवा कचऱ्याजवळ ठेवू नये.
– आग लागल्यास स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न न करता तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, नागरिकांनी अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करून स्वतःसह कुटुंबीयांची आणि परिसरातील इतर नागरिकांची सुरक्षितता जपावी. खबरदारी आणि जबाबदारीच्या माध्यमातून दिवाळीचा सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक

१. पिंपरी (मुख्य) – ९९२२५०१४७५

२. भोसरी – ९९२२५०१४७६

३. प्राधिकरण – ९९२२५०१४७७

४. रहाटणी – ९९२२५०१४७८

५. चिखली – ८६६९८९४१०१

६. तळवडे – ९५५२५२३१०१

७. थेरगाव – ७०३०९०७९९९

८. मोशी – ७२६४९४३३३३

९. चोवीसावाडी – ७७५८९९२८१७

१०. नेहरूनगर – ८४८४८८४१०१

“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागाला आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनीही सहकार्य करून सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि आनंदी व सुरक्षित दिवाळी साजरी करावी.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

“दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील घटनांचा अभ्यास करून शहरातील २२ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहेत. २५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने आणि गस्ती वाहनांद्वारे २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. नागरिकांनीही फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि कोणतीही दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.”

– व्यंकटेश दुर्वास, मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!