शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडीतील यमुनानगर परिसरात असलेल्या बजाज ऑटो कंपनीच्या पेंट शॉपमधून केमिकलयुक्त दुर्गंधी आणि विषारी धूर बाहेर पडत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या दुर्गंधीमुळे यमुनानगर, सेक्टर २२ आणि ओटा स्कीम परिसरातील हजारो नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि मळमळ यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी प्रशासनाने सात दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.
यासंदर्भात मनसेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि बजाज ऑटोच्या प्लांट हेड यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच या निवेदनाची प्रत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनानुसार, बजाज ऑटोच्या यमुनानगर येथील पेंटिंग शॉपमधून गेल्या अनेक महिन्यांपासून केमिकलयुक्त दुर्गंधी आणि धुराचे उत्सर्जन होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असताना कंपनी प्रशासनाकडून यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
या समस्येबाबत कंपनीच्या पर्यावरण विभागाला तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाला वेळोवेळी लेखी आणि तोंडी स्वरूपात माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष बैठक घेऊनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे कंपनी प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका सचिन चिखले यांनी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तातडीच्या तपासणीची मागणी
या प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने दखल घेऊन कंपनी परिसरातील हवेची गुणवत्ता तपासावी, हवेचे नमुने घ्यावेत आणि पेंट शॉपमधून होणाऱ्या उत्सर्जनाची सखोल पाहणी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ मधील कलम २१ आणि २२ च्या अनुषंगाने प्रदूषण आढळल्यास संबंधित कंपनीवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
सात दिवसांची मुदत; अन्यथा बजाज ऑटोसमोर आंदोलन
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष करू नये. पुढील सात दिवसांत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बजाज ऑटोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सचिन चिखले यांनी दिला आहे.
औद्योगिक विकास महत्त्वाचा असला, तरी त्याची किंमत परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोजावी लागता कामा नये. त्यामुळे बजाज ऑटो प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका प्रशासन या तक्रारीची किती गांभीर्याने दखल घेतात आणि नागरिकांना केमिकल दुर्गंधीच्या त्रासातून कधी दिलासा मिळतो, याकडे यमुनानगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 237999