spot_img
spot_img
spot_img

योगदान प्रतिष्ठानच्या भव्य दिवाळी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

नगरसेवक सुरेश भोईर यांचा आठ वर्षांपासून सामाजिक उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासोबतच स्थानिक महिला उद्योजिका, छोटे व्यावसायिक आणि होतकरू विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने योगदान प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिवाळी प्रदर्शन व खरेदी-विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात तब्बल दीडशे स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले. गेल्या आठ वर्षांपासून सुरेश भोईर सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करत असून, यंदाही नागरिकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, माजी महापौर अपर्णाताई डोके, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, कामगार नेते अंबर चिंचवडे, हेमंत डांगे, रवींद्र प्रभुणे, दीपाली कलापुरे, सोनाताई गडदे, रेखाताई जाजू, मिनाक्षीताई इंगळे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रदर्शनात दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळाली. आकर्षक आकाशकंदील, रंगीबेरंगी पणत्या, दिवे, दिवाळी फराळ, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, सजावटीच्या वस्तू अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे, महिलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले घरगुती खाद्यपदार्थ, वडापाव, थालीपीठ, पाणीपुरी, भेळ, केक तसेच विविध नावीन्यपूर्ण पदार्थांचे स्टॉल्स नागरिकांचे आकर्षण ठरले. याशिवाय लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आणि त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात आले होते.

महिला बचत गट आणि स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन

या प्रदर्शनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक महिला आणि छोट्या व्यावसायिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे. अनेक महिलांनी घरगुती पदार्थ, हस्तकला आणि विविध सजावटीच्या वस्तू तयार करून त्यांचे स्टॉल्स उभारले होते. त्यांना स्टॉल्ससाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. त्यामुळे महिलांना आपल्या कौशल्याच्या जोरावर आर्थिक उत्पन्न मिळवण्याची आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संधी मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘लोकल फॉर व्होकल’ या आवाहनाला या उपक्रमातून प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे आणि महिला उद्योजकांना स्वावलंबी बनविणे हा या आयोजनामागील सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून आले.

घराच्या जवळच दिवाळी खरेदी; नागरिकांकडून समाधान व्यक्त

पिंपरी-चिंचवडसारख्या गजबजलेल्या शहरात दिवाळी खरेदीसाठी मुख्य बाजारपेठांमध्ये जावे लागते. तेथे होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. मात्र, प्रभागातील नागरिकांसाठी घराजवळच भव्य दिवाळी बाजार उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी दिवाळीच्या सर्व आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्याने कुटुंबांसह नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत खरेदीचा आनंद घेतला.

तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे परिसरात दिवाळीचा उत्साह आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणाई आणि लहान मुलांचा मोठा सहभाग या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला.

गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करून नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी केवळ दिवाळी खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली नाही, तर स्थानिक महिला आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणारा हा उपक्रम स्थानिक व्यवसायाला चालना देणारा आणि महिला सक्षमीकरणाला बळ देणारा ठरत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!