spot_img
spot_img
spot_img

चाकणमध्ये तरुणाला गाठून लुटले; १८ हजारांची रोकड, मोबाईल हिसकावला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 मैत्री करण्याच्या बहाण्याने बोलावून एका तरुणाला अडवून शिवीगाळ व मारहाण करत त्याच्याकडील रोकड आणि मोबाईलमधील २६ हजार रुपये किमतीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याची घटना चाकण येथील हाती चक्रेश्वर मंदिर रस्त्यालगत घडली. याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुरेंद्र मोतीराम काळे (वय ३०, व्यवसाय खासगी नोकरी, रा. खरपुडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिहान सरदार शेख (वय १९, रा. चाकण) आणि सुजल सचिन डोंगरे (वय २१, रा. चाकण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीला फोन करून मैत्री करण्याच्या बहाण्याने चक्रेश्वर मंदिराजवळील गार्डन परिसरात बोलावले. फिर्यादी मोटारसायकलवरून तेथे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर प्रेम नावाचा आणखी एक तरुण तेथे आला. त्याने फिर्यादीच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली.

त्यानंतर आणखी तीन अनोळखी तरुण तेथे आले. त्यांनी फिर्यादीला विनाकारण शिवीगाळ व दमदाटी करून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीकडील १८ हजार रुपये रोख रक्कम तसेच एमआय कंपनीचा मोबाईल पॉवर बँक हिसकावून घेतला. मोबाईलमधील गुगल पेच्या माध्यमातून २६ हजार रुपये अन्य व्यक्तीच्या मोबाईलवर स्कॅन करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तक्रार केल्यास सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले. घाबरलेल्या फिर्यादीने सुरुवातीला घरी जाणे पसंत केले. त्यानंतर कुटुंबीयांनी विश्वास दिल्याने त्यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!