राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना निवेदन; प्रमोद ओंबासे आणि अजय सूर्यवंशी यांच्यावर कारवाईची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी प्रमोद ओंबासे आणि अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोर घेराव आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आयुक्तांना हे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी प्रमोद ओंबासे यांना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी लाच मागितल्याच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांचेही नाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीमध्ये असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेतील उच्च पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तीच जर ठेकेदारांकडून खंडणी मागत असतील, तर महापालिकेची कामे योग्य पद्धतीने कशी होणार, असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. महापालिकेचा कारभार स्वच्छ ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, संबंधित अधिकारी महापालिका सेवेत आल्यापासून आतापर्यंतच्या सर्व मालमत्तेची आणि बँक खात्यांची चौकशी करावी. त्यांच्या नातेवाइकांच्या मालमत्तेची आणि बँक खात्यांचीही तपासणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. चौकशीत चुकीच्या पद्धतीने माया जमवल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना महापालिका सेवेतून निलंबित करावे, असेही पक्षाने म्हटले आहे.
या प्रकरणात न्याय्य पद्धतीने लक्ष घालून कारवाई करावी. अन्यथा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य जनतेचा अविश्वास निर्माण होईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महापालिका कार्यालयासमोर घेराव आंदोलन करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांची स्वाक्षरी असून, पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. यावेळी जयंत शिंदे, राजू खंडागळे, काशिनाथ जगताप, संतोष शिंदे ,अनिल भोसले, अजय पिल्ले ,नितीन बुगासे उपस्थित होते




Total Users : 237941