शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोणतेही व्यसन असो, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊन विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईनेही व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. व्यसन करण्यापेक्षा मनःशांती आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करणे अधिक आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सेविका रंजना बिद्रे यांनी केले.
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी व्यसनमुक्त जीवनशैली, मानसिक शांतता आणि निरोगी आरोग्याचे महत्त्व विशद केले.
सभेची सुरुवात जयलक्ष्मी अमीन, मालती कवडे आणि सायली चौधरी यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. यावेळी फकीरभाई पानसरे उर्दू माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सलाम इनामदार यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली. मोबाईलचा अतिवापर ही समाजाला लागलेली कीड असून, प्रत्येकाने मोबाईलचा वापर कमीत कमी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यवाह आणि ज्येष्ठ कवयित्री गीता सुतार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपापले छंद जोपासले पाहिजेत. छंदामुळे जीवनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वतःची कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
संघाचे संस्थापक विशाल बाळासाहेब काळभोर यांनी संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील विविध सामाजिक उपक्रम आणि संकल्पनांची माहिती दिली.
यावेळी ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करून त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सभेतील लकी ड्रॉमध्ये सरिता कालेकर या भाग्यवान विजेत्या ठरल्या.
सभेचे प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनी केले, तर प्रकाश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. सभेचे संयोजन विजय निकम, एकनाथ कालेकर, विजय सुर्वे आणि रवींद्र मांजरेकर यांनी केले. तसेच सभेच्या नियोजनासाठी गोविंद देशमुख, सचिन मोकाशी आणि इब्राहिम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य, सामाजिक सलोखा, मनोरंजन आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत असून, अशा मासिक सभांमुळे ज्येष्ठांना एकत्र येण्याची आणि आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळत आहे.




Total Users : 237915