शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्र. ०८ (मोशी प्राधिकरण, इंद्रायणी नगर परिसर) मधील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून भेडसावणाऱ्या दूषित, अनियमित, विषम आणि अत्यंत कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत स्थानिक नगरसेवक तथा विधी समिती सदस्य तुषार भिवाजी सहाणे आणि नगरसेविका अश्विनी संजय वाबळे यांनी संयुक्तपणे आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाला जाब विचारला. या गंभीर समस्येवर पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महापालिकेत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मनोज सेठिया, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले, संबंधित कनिष्ठ अभियंता तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. तसेच बैठकीत माजी नगरसेवक संजय वाबळे हे देखील उपस्थित होते.
बैठकीत दोन्ही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे:
१. दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न: राजवाडा परिसर, जय गणेश साम्राज्य, लांडगे नगर, गुरुविहार कॉलनी आणि सेक्टर ०९ या भागांमधील नळांना नियमितपणे दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही गळती शोधून सांडपाणी मिसळणारे पॉईंट्स युद्धपातळीवर दुरुस्त करावेत.
२. अनियमित व अवेळी पाणीपुरवठा: सेक्टर ०४, ६ आणि ९ या भागांत पाणीपुरवठ्याची कोणतीही ठरावीक वेळ पाळली जात नसून मध्यरात्री अथवा भरदुपारी पाणी सोडले जाते. ही मनमानी थांबवून पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ ठरवण्यात यावी.
३. विषम पाणीवाटप व कमी दाब: सेक्टर ०१ व सेक्टर ०४ मध्ये मुख्य लाईनजवळ पाणी पोहोचते; मात्र शेवटच्या टोकावरील (Tail End) भागांत पाण्याचा थेंबही पोहोचत नाही. तसेच सेक्टर ०४ व ९ मधील कमी दाबाची समस्या सोडवण्यासाठी वितरण वाहिन्यांचे तातडीने ‘प्रेशर ऑडिट’ (Pressure Audit) व हायड्रॉलिक बॅलन्सिंग करण्यात यावे.
४. जीआयएस मॅपिंग व कायमस्वरूपी नियोजन: प्रभागातील जुन्या जलवाहिन्यांचा तांत्रिक गोंधळ संपवण्यासाठी संपूर्ण प्रभागातील वाहिन्यांचे डिजिटल जीआयएस मॅपिंग करावे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईपलाईनचा तांत्रिक प्रस्ताव तात्काळ तयार करावा.
“नागरिकांना पुरेसे आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे हे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. स्वतःच्या शहरातील पाईपलाईनचे रेकॉर्ड नसणे किंवा अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांवर अवलंबून राहणे हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता पाणीपुरवठा विभागाने येत्या दोन दिवसांत संपूर्ण तांत्रिक पाहणी पूर्ण करून नागरिकांना नियमित दाबाने शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.”
— तुषार भिवाजी सहाणे (नगरसेवक – प्रभाग क्र. ०८ तथा सदस्य, विधी समिती, PCMC)
“दूषित पाणी आणि मध्यरात्री-अपरात्री होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे घरातील गृहिणी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाणीपट्टी नियमित भरूनही नागरिकांना अशा नरकयातना भोगाव्या लागत असतील, तर हा प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा आहे. प्रभागातील एकाही नागरिकाच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गळती रोखावी व टेल-एंडपर्यंत समान दाबाने पाणी पोहोचवावे, यासाठी आमचा सातत्याने प्रशासकीय पाठपुरावा सुरू राहील.”
— अश्विनीताई संजय वाबळे (नगरसेविका – प्रभाग क्र. ०८, PCMC)
बैठकीच्या शेवटी शहर अभियंता मनोज सेठिया यांनी दोन्ही नगरसेवकांनी मांडलेल्या सर्व समस्यांची गंभीर दखल घेतली असून, प्रभागात तांत्रिक पथकामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठ्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.




Total Users : 237999