शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथे भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून एका कारला धडक दिल्याने दहा वर्षांची मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात इरटिका कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रणजितकुमार उपेंद्रनाथ पांडे (वय ४५, रा. पुनावळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.१० वाजता टाटा कंपनीच्या मागील गेटजवळ, नक्षत्रम सोसायटीसमोर, चिंचवड येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश बाबासाहेब चव्हाण (वय ३४, व्यवसाय वाहनचालक, रा. विठ्ठलनगर, साने चौक, चिखली, पुणे) हा एमएच ५० एन ५४१० क्रमांकाची इरटिका गाडी चालवत होता. त्याने रहदारीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा प्रकारे वाहन चालवून फिर्यादीच्या गाडीला धडक दिल्याचा आरोप आहे.
या धडकेत फिर्यादीची दहा वर्षांची मुलगी सुप्रिया रणजितकुमार पांडे हिच्या मानेस दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Total Users : 232136