शहराच्या विकासाचा पाया रचणाऱ्या अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवडचा वैभवशाली प्रवास!
शबनम न्यूज | प्रतिनिधी
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा पाया रचणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहराचे शिल्पकार, थोर नेते मा. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
अण्णासाहेब मगर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी ठेवून पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीचा पाया घातला. त्यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला विकासाचा प्रवास आज व्यापक स्वरूपात पुढे जात असून, औद्योगिक विकास, नागरी सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या जोरावर पिंपरी-चिंचवडने देशातील अग्रगण्य शहरांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याप्रमाणे शहरानेही प्रगतीची मोठी झेप घेतली आहे.
महानगरपालिकेच्या ४४ वर्षांच्या वाटचालीत शहराने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. उद्योग, शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात शहराची ओळख अधिक भक्कम झाली आहे. या विकासाच्या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
वर्धापन दिनानिमित्त शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या महान नेत्यांच्या कार्याचे स्मरण करताना, भविष्यातही पिंपरी-चिंचवडला अधिक स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि आधुनिक शहर बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, विविध विभागांचे संपर्क अधिकारी, प्रकल्प अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या.




Total Users : 230186