spot_img
spot_img
spot_img

संगीताच्या अलवार लहरींवर डोलले रसिक प्रेक्षक!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठी शब्दांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचे तरल विश्व… अशा सुरेल वातावरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा सांगता सोहळा रंगला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या अविनाश-विश्वजीत यांच्या संगीत मैफिलीने रसिकांना स्वरानंदाची अविस्मरणीय अनुभूती दिली. लोकप्रिय मराठी गीतांच्या सादरीकरणातून प्रेम, विरह, भक्तिभाव, उत्साह आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे विविध रंग उलगडत या मैफिलीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या सांस्कृतिक पर्वावर सुरेल मोहोर उमटवली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ याकाळात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप अविनाश-विश्वजीत यांच्या सुरेल मैफिलीने झाला.

मैफिलीची सुरुवातच ‘मोगरा फुलला’ या गीताने झाली आणि स्वरांच्या या सुगंधी प्रवासात रसिक मन रमून गेले. त्यानंतर ‘का कळेना’, ‘कधी तू’, ‘भेटला विठ्ठल’, ‘फूलवंती टायटल साँग’ अशा गीतांनी मैफिलीला रंगत आणली. ‘केव्हा तरी पहाटे’ आणि ‘ओल्या सांजवेळी’ यांसारख्या गीतांनी भावनांच्या हळुवार हिंदोळ्यावर रसिकांना अलगद झुलवले. गीतांचे शब्द, गायकांच्या सुरेल आवाजातील भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि संगीताची साथ यांचा सुंदर मिलाफ या वेळी अनुभवायला मिळाला.

‘फॅन्टॅस्टिक’, ‘मदनमंजिरी’, ‘साथ दे / तुला पाहता’ आणि ‘आदी तूच अंती तूच’ या गीतांनी मैफिलीची रंगत अधिकच वाढवली. प्रत्येक गीताच्या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. कधी प्रेमभावनेचा हळुवार स्पर्श, तर कधी सुरांच्या लयीतील चैतन्य अशा विविध भावछटांनी सजलेल्या या मैफिलीने प्रेक्षागृहात आनंदाचे वातावरण निर्माण केले.

मध्यंतरानंतरही स्वरांची ही मैफल नव्या उत्साहाने बहरली. ‘आली ठुमकत नार छौ’, ‘अविनाश इन्स्ट्रुमेंटल’ आणि ‘कुसुमाग्रज… कविता… विश्वजीत’ या सादरीकरणांनी संगीत, साहित्य आणि काव्य यांचा अनोखा संगम घडवला. विशेषतः कुसुमाग्रजांच्या कवितेच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वातील शब्दसामर्थ्य आणि भावसौंदर्याचा प्रत्यय आला. संगीताच्या माध्यमातून मराठी भाषेतील साहित्यिक समृद्धी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळाली.

‘हृदयात वाजे समथिंग’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘असा हा धर्मवीर ट्रॅक’ या गीतांनी मैफिलीला भावनिक, काव्यात्मक आणि ऊर्जावान वळण दिले. विविध गायकांनी सादर केलेल्या या गीतांमधून मराठी संगीताची व्यापकता आणि वैविध्य अधोरेखित झाले. गीतांमधील शब्दार्थ, सुरांमधील भाव आणि तालातील ठेका यामुळे रसिकांचा उत्साह अखेरपर्यंत कायम राहिला.

‘हंबीर तू’ या गीताने मैफिलीची रंगत पुढे नेत अंतिम टप्प्यातील उत्साह अधिकच वाढवला. प्रेक्षागृहात दुमदुमणाऱ्या सुरांनी आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या सांगता सोहळ्याला संस्मरणीय रूप प्राप्त झाले. स्वरांच्या या अविस्मरणीय पर्वातून अभिजात मराठी भाषा सप्ताहाला खऱ्या अर्थाने सुरेल पूर्णविराम मिळाला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!