spot_img
spot_img
spot_img

बालस्वरांपासून अजय-अतुलच्या सुरांपर्यंत रंगली अभिजात मराठीची सांगीतिक मैफल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत शहरातील महापालिकेच्या विविध सभागृहांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आचार्य अत्रे रंगमंदिर आणि नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे बालगीत, नृत्याविष्कार तसेच मराठी गीतांच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले. बालकलाकारांच्या निरागस सादरीकरणापासून अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांच्या सुरांपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आचार्य अत्रे रंगमंदिर येथे भारती न्यायाधीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी बालगीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना विजय न्यायाधीश यांची होती. बालकलाकारांनी विविध भक्तीगीते आणि बालगीतांवर नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ध्वनी गुप्ता, शौर्यवी मांडवगडे आणि ईरा चायनाकवा या बालकलाकारांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंग भरला. भारती न्यायाधीश यांनीही आपल्या सुरेल आवाजात गाण्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

‘या हो या गणपती बाप्पा या हो या’, ‘कावळे दादा काव काव’, ‘आमच्या घरची मनीमाऊ’, ‘कोंबडीने शिकवले पिल्लाला’, ‘डूबी डूबी डम डम’ आदी बालगीतांवरील सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. बालकलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमस्थळी आनंदमयी वातावरण निर्माण झाले.

यावेळी प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, नेहरूनगर येथील महानगरपालिका उर्दू शाळेतील शिक्षक रोहिणी हरकारे, मनीषा प्रसाद, सालेहा तांबोळी आणि मोहम्मद सय्यद तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले, तर आभार प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी यांनी मानले.

दरम्यान, नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी येथे अमीर शेख व चंद्रकांत नगरकर प्रस्तुत ‘सदाबहार अजय-अतुल’ या विशेष मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अजय-अतुल यांच्या लोकप्रिय गीतांची सुरेल मेजवानी, बहारदार लावणीचे सादरीकरण, प्रभावी गायन आणि दमदार वाद्यवृंद यामुळे ही सांगीतिक मैफल रंगतदार ठरली. रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचा उत्साह वाढवला.

‘हळद पिवळी’च्या सुरांनी मैफलीची सुरुवात रंगतदार केली. ‘जीव रंगला गुंतला’च्या भावस्पर्शी सुरांनी रसिकांचे भावविश्व खुलवले, तर ‘सैराट झालं जी’च्या तालावर रसिकांनी ठेका धरला. ‘वाऱ्यावरती गंध पसरला’च्या सुरांनी वातावरणात संगीताचा दरवळ निर्माण केला. ‘बहरला हा मधुमास’ने मैफलीत सुरेल भावविश्व फुलवले, तर ‘गालावर खळी, डोळ्यात धुंदी’ या लोकप्रिय गीताला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांच्या माध्यमातून भरभरून प्रतिसाद दिला. ‘आताच बया का बावरलं’ या गीताच्या सादरीकरणानेही मैफलीत उत्साहाची भर पडली.

गीतांच्या सादरीकरणासोबत वाद्यवृंदानेही आपल्या वादनकौशल्याची प्रभावी झलक सादर केली. गायकांच्या सुरांना वाद्यांची समर्थ साथ मिळाल्याने प्रत्येक गीताचे सादरीकरण अधिक प्रभावी झाले. काही गीतांदरम्यान वादकांनी स्वतंत्र वादनातून आपल्या कलाकौशल्याची झलक दाखवली. त्यावेळी रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत वादकांना उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमातील लावणीच्या सादरीकरणाने विशेष रंगत आणली. पारंपरिक मराठी लोककलेचा ठेका, अदाकारी आणि उत्साहपूर्ण सादरीकरणामुळे रंगमंदिरातील वातावरण जल्लोषमय झाले. लावणीच्या ठेक्यावर रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांना प्रतिसाद दिला.

अजय-अतुल यांच्या संगीताच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्या रचनांमधील लोकसंगीत, आधुनिक वाद्यमेळ आणि भावपूर्ण शब्दरचनेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. लाईव्ह सादरीकरणातील गीतांचे शब्द, सूर आणि संगीत यामुळे रसिकांना आपल्या आठवणी आणि भावनांशी जोडणारा अनुभव मिळाला.

कार्यक्रमात कविता राम, संदीप उबाळे, आशिष देशमुख, झैनुल, मोहम्मद रफी शेख आणि कविता सेंजर यांनी विविध गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सुरेल गायनाला वाद्यवृंदाची समर्थ साथ लाभली. कार्यक्रमाचे निवेदन अभय गोखले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य समन्वयक समीर सूर्यवंशी तसेच समन्वयक वैजयंती भालेराव आणि स्मिता देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!