spot_img
spot_img
spot_img

प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत हास्याचा ‘ऑल दि बेस्ट’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद, बदलती नाती आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न… अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दोन नाटकांनी मंगळवारी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगत आणली. ‘ऑल दि बेस्ट’ या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसविले, तर ‘वरवरचे वधू-वर’ने आजच्या पिढीच्या प्रेम आणि विवाहाकडे पाहण्याच्या बदलत्या दृष्टिकोनाचा विनोदी पद्धतीने वेध घेतला. दोन्ही प्रयोगांना नाट्यरसिकांची तुफान गर्दी उसळली होती. नाट्यरसिकांचे एवढे प्रेम पाहून कलाकारही भारावून गेले.

मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा परिचय नागरिकांना व्हावा, तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सप्ताहाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या अभिनयाने नाटकाला चांगली रंगत आली. विनोदी प्रसंग आणि संवादांमुळे प्रेक्षकांना हसता हसता आनंद मिळाला. त्याचबरोबर शारीरिक अक्षमतेवर मात करून आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाटकातून मांडण्यात आला. मैत्री आणि एकमेकांना साथ देण्याचे महत्त्वही नाटकाच्या माध्यमातून सांगण्यात आले. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या प्रयोगासाठी प्रेक्षागृह पूर्णपणे भरले होते.

सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचा प्रयोग झाला. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकातून आजची पिढी प्रेम आणि लग्नाकडे कशी पाहते, याचे चित्रण करण्यात आले. लग्नाचा निर्णय घेताना तरुण-तरुणींच्या मनात असलेला संभ्रम, नात्यांमधील अपेक्षा आणि ‘कमिटमेंट’ स्वीकारताना येणाऱ्या अडचणी यावर नाटकातून विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले.

विषय आजच्या पिढीशी संबंधित असल्याने अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना आपलेच अनुभव दिसून आले. मिश्कील संवाद, सहज अभिनय आणि प्रसंगातील विनोदामुळे नाटकाला चांगली रंगत आली. मनोरंजनासोबतच नात्यांकडे नव्या नजरेने पाहण्याचा विचारही या नाटकातून मांडण्यात आला. या प्रयोगालाही रसिकांनी मोठी गर्दी केली.

‘ऑल दि बेस्ट’ या नाटकातून विनोद, गमती-जमती आणि प्रसंगांच्या माध्यमातून सकारात्मकतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचला, तर ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकातून बदलत्या काळातील नातेसंबंध, त्यातील गुंतागुंत आणि माणसांच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला. दोन्ही नाटकांनी वेगवेगळ्या विषयांना हात घालत रसिकांचे मनापासून मनोरंजन केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. नाटक सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कलाकारांच्या अभिनयाला मिळणारी दाद यामुळे प्रेक्षागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्जेदार मराठी नाटक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने दोन्ही प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळाला.

या नाट्यप्रयोगांच्या निमित्ताने केवळ मनोरंजनच झाले नाही, तर मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि आजच्या काळाशी जोडलेले आशयपूर्ण विषयही रसिकांसमोर आले. नागरिकांचा मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी नाटक, साहित्य, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांविषयी पिंपरी चिंचवडकरांची असलेली आवड सर्वश्रुत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!