नगरसेवक तुषार सहाणे यांची मागणी; उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून PMRDA अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशी परिसरातील सेक्टर ९, ११ आणि १३ येथील PMRDAच्या मोकळ्या भूखंडांवर सुरू असलेले अनधिकृत पार्किंग तातडीने हटवावे आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने PIECCचा प्रशस्त परिसर सकाळच्या वेळेत वॉकिंग व जॉगिंगसाठी खुला करावा, अशी मागणी नगरसेवक तथा विधी समिती सदस्य तुषार भिवाजी सहाणे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात सहाणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली. निवेदनाची तत्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री कार्यालयाने PMRDAच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे सुरक्षेचा प्रश्न
प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर ९, ११ आणि १३ येथील PMRDAच्या मोकळ्या भूखंडांवर ट्रॅव्हल्स बसेस, अवजड वाहने तसेच इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून हे भूखंड तातडीने अतिक्रमणमुक्त करून संरक्षित करण्याची मागणी सहाणे यांनी केली आहे.
PIECC परिसर सकाळी ६ ते १० खुला करण्याची मागणी
मोशी परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांना सुरक्षित वातावरणात व्यायाम करता यावा, यासाठी ‘पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर’ (PIECC)चा परिसर दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत वॉकिंग व जॉगिंगसाठी खुला करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सहाणे यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या खाजगी सचिवांनी निवेदनावर स्वाक्षरी करून हे प्रकरण पुढील उचित कार्यवाहीसाठी PMRDAकडे वर्ग केले आहे.
“PMRDAच्या भूखंडांवर सुरू असलेले बेकायदेशीर पार्किंग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन हे भूखंड मोकळे करावेत. तसेच PIECCचे आवार नागरिकांच्या आरोग्यासाठी खुले करावे. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,” असा विश्वास तुषार भिवाजी सहाणे यांनी व्यक्त केला.




Total Users : 228699