शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील विविध सोसायट्यांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक सेलचे शहराध्यक्ष विनोद वरखडे पाटील यांनी केली आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी प्राईम पेस्ट कंट्रोलचे मालक संतोष मायने उपस्थित होते. सोसायट्यांच्या आवारात रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना घाबरवणे तसेच कुत्रे चावण्याच्या घटना घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “नागरिकांनी भीतीच्या वातावरणात जगायचे का?” असा सवालही वरखडे पाटील यांनी उपस्थित केला.
महापालिकेने सोसायटी परिसरातील भटक्या कुत्र्यांचे तातडीने सर्वेक्षण करून निर्बिजीकरण व लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी. नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आक्रमक कुत्र्यांबाबत नियमांनुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच सोसायट्यांमध्ये कचरा व अन्नकचरा उघड्यावर पडणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी अधिक सक्षम हेल्पलाइन व्यवस्था निर्माण करून तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठराविक कालमर्यादेत संबंधित पथकाने घटनास्थळी पोहोचून कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे केवळ कागदोपत्री कारवाई म्हणून न पाहता प्रत्यक्ष कार्यवाही करावी. केवळ आश्वासने न देता केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नागरिकांना द्यावा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.




Total Users : 228527