विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले का? ई-रुपी व्यवहारांची पडताळणी करा; १५० एकरांवरील गोल्फ कोर्सच्या प्रस्तावालाही शिवसेनेचा विरोध
प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड
पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या २४ कोटी ९७ लाख रुपयांच्या ई-रुपी शालेय साहित्य योजनेच्या अंमलबजावणीवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत संपूर्ण शालेय साहित्य मिळाले नसल्याच्या तक्रारी असताना संबंधित पुरवठादारांची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या ठराव क्रमांक ९६०, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ नुसार सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी डीबीटीअंतर्गत ई-रुपी पद्धतीने शालेय साहित्य पुरविण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली होती. या योजनेसाठी १२८ शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता २४ कोटी ९७ लाख रुपयांच्या अंदाजित खर्चाची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सर्व साहित्य मिळाले का, पुरवठादारांनी करारातील अटींचे पालन केले का, तसेच क्यूआर कोड स्कॅनिंग आणि ई-रुपी व्यवहार नियमानुसार झाले का, याची तपासणी करण्याची मागणी पवार यांनी केली.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून साहित्य वितरणाची माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले. साहित्याचा पूर्ण पुरवठा झाला नसताना ठेकेदारांची बिले कोणाच्या आदेशाने अदा करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या साहित्याची स्वतंत्र पडताळणी, संपूर्ण योजनेचे विशेष लेखापरीक्षण आणि ई-रुपी व्यवहारांची तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्या पुरवठादारांचे करार रद्द करून नियमानुसार काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.
गोल्फ कोर्सपेक्षा कचरा आणि पाणीप्रश्न सोडवा!
शहरातील सुमारे १५० एकर जागेवर प्रस्तावित गोल्फ कोर्सच्या प्रकल्पावरही चेतन पवार यांनी आक्षेप घेतला. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. अनेक परिसरांत पाणीटंचाईची समस्या कायम आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याऐवजी गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पाचा आग्रह कशासाठी धरला जात आहे, असा सवाल त्यांनी केला.
“शहरातील कचऱ्याची समस्या सुटत नाही, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गोल्फ कोर्ससारख्या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज काय? हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे की मोजक्या श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी? सार्वजनिक जागा अशा प्रकल्पांसाठी वापरण्यास आमचा ठाम विरोध आहे,” अशी भूमिका पवार यांनी मांडली.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम पाडल्यानंतर ती जागा धूळखात पडली असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पुरेशी क्रीडांगणे उपलब्ध नसताना १५० एकर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी पुनावळे येथे सार्वजनिक जागा देण्याचा विषय पुढे आला होता. त्यावेळीही शिवसेनेने विरोध केला होता. सार्वजनिक जागांचा वापर नेमका कोणाच्या हितासाठी केला जात आहे आणि या प्रकल्पासाठी जनतेच्या पैशांचा किती खर्च होणार आहे, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शहराचा विकास करताना कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. शालेय साहित्य खरेदीतील कथित अनियमितता आणि गोल्फ कोर्सचा प्रस्ताव या दोन्ही विषयांवर महापालिका प्रशासनाने जनतेसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे आवाहन चेतन पवार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, अनिल सोमवंशी, पार्थ गुरव, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, तुषार नवले, गणेश आहेर, नितीन घोलप, रावसाहेब थोरात, दिलीप सावंत, नितीन बोंडे, कैलास नेवासकर, शिवाजी शेळके, नाथाभाऊ खांडेभराड, विकास एकशिंगे, सतीश मरळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




Total Users : 242158