spot_img
spot_img
spot_img

स्वीकृत नगरसेवकपदासाठी सचिन काळभोर यांच्या नावाची महापौर-उपमहापौरांकडून शिफारस !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लेखी पत्र; आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेकडे लक्ष, भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणांची चर्चा

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीवरून भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी भाजपच्या कोट्यातील सात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होण्याची शक्यता असतानाच, भाजपचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, काळभोर यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्यात यावी, अशी लेखी शिफारस महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या नियुक्तीच्या प्रक्रियेला आता वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापौर आणि उपमहापौरांनी स्वतः पुढाकार घेऊन काळभोर यांच्या नावासाठी वरिष्ठ नेतृत्वाकडे शिफारस केल्याने भाजपच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पक्षासाठी केलेले काम, सामाजिक क्षेत्रातील सक्रियता आणि संघटनात्मक योगदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना संधी मिळावी, अशी भूमिका या शिफारशीमागे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात असल्याने काळभोर यांच्या नावाचा समावेश होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

*महेश लांडगे यांच्या भूमिकेची उत्सुकता; स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण!*

सचिन काळभोर आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय मतभेदांची चर्चा यापूर्वीही अनेकदा झाली आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी केलेल्या शिफारशीवर आमदार लांडगे यांची भूमिका काय असेल, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काळभोर यांच्या नावाला स्थानिक पातळीवरून पाठिंबा मिळणार की पक्षांतर्गत समीकरणांचा परिणाम या नियुक्तीवर होणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

मात्र, आमदार महेश लांडगे यांनी या शिफारशीबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी सुरू असलेल्या चर्चांना केवळ राजकीय चर्चेचे स्वरूप आहे. अंतिम निर्णयापूर्वी स्थानिक नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

*आठ महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या; भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी!*

महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्त्यांचा विषय गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असल्याची चर्चा आहे. या पदांसाठी भाजपमधील विविध गटांतील इच्छुकांनी आपापल्या स्तरावर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार, खासदार, मंत्री तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी पक्षांतर्गत प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन नावांची घोषणा झाल्याचे सांगितले जात असताना भाजपच्या सात जागांसाठी अद्याप अंतिम यादी समोर आलेली नाही. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पक्षातील विविध गटांचे राजकीय समीकरण, स्थानिक नेतृत्वाची भूमिका आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय या सर्व बाबी नियुक्त्यांमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत.

*महापौर-उपमहापौरांच्या पत्रामुळे काळभोर यांच्या दाव्याला नवी चर्चा!*

स्वीकृत नगरसेवकपदासाठी सचिन काळभोर यांच्या नावाची महापौर आणि उपमहापौरांनी केलेली लेखी शिफारस हा या संपूर्ण घडामोडीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वोच्च पदांवरील पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे भूमिका मांडल्याने या शिफारशीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या शिफारशीचा विचार करून काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. २० नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या सात नावांमध्ये सचिन काळभोर यांचा समावेश होतो की नाही, यावर त्यांच्या राजकीय वाटचालीच्या पुढील टप्प्याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

एकीकडे महापौर-उपमहापौरांची लेखी शिफारस, दुसरीकडे आमदार महेश लांडगे यांच्याशी संबंधित राजकीय चर्चांचा संदर्भ आणि तिसरीकडे इच्छुकांमधील स्पर्धा, अशा पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपमधील स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!