बिनशर्त माफीसह पक्षातून हकालपट्टीची मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पत्रकार परिषदेत फाडल्याच्या कथित प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाहीर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांचे फोटो फाडून मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि मराठी माणसाच्या संघर्षाचे प्रतीक आहेत. अशा महान नेत्याचा फोटो पत्रकार परिषदेत जाहीरपणे फाडण्याचे कृत्य निषेधार्ह असल्याची भूमिका मनसेने घेतली. फोटो फाडल्यानंतर करण्यात आलेली सारवासारव ही महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोपही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या आंदोलनाद्वारे मनसेने शायना एन.सी. यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी, शिंदे गटाने त्यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा तीन प्रमुख मागण्या केल्या.
बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान मनसे कदापि सहन करणार नाही. त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्यांना मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशाराही यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, महिला शहराध्यक्ष सीमा बेलापुरकर, राजू सावळे, बाळा दानवले, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरसे, नारायण पठारे, विक्रम भोसले, विष्णू चावरिया, आकाश सागरे, दत्तात्रय डांगे आणि शिवम महाराणा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 242034