spot_img
spot_img
spot_img

कासारसाई धरणातील पाणी दूषित होत असल्याची शेतकरी व ग्रामस्थांची तक्रार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कासारसाई धरण परिसरात मत्स्य व्यवसाय करणाऱ्या वैदिका ग्रुप या कंपनीमुळे धरणातील पाणी दूषित होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील कासारसाई धरणात वैदिका ग्रुपकडून मत्स्य व्यवसाय चालविला जात आहे. मात्र या व्यवसायातून निर्माण होणारा कचरा आणि सांडपाणी योग्य प्रकारे प्रक्रिया न करता थेट धरणाच्या पाण्यात सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, धरणातील हेच पाणी परिसरातील शेतकरी शेतीसाठी वापरतात. त्यामुळे दूषित पाण्याचा परिणाम पिकांवर होत असून उत्पादनात घट होत आहे. तसेच हे पाणी हाताळताना किंवा वापरताना काही ग्रामस्थांना त्वचेचे आजार होत असल्याची तक्रारही समोर आली आहे.

तसेच मत्स्य व्यवसायासाठी वापरले जाणारे माशांचे खाद्य आणि माशांची विष्टा यामुळे दररोज सुमारे ५ टनांपर्यंत कचरा तयार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हा कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित न करता थेट धरणात मिसळत असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, धरणाच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे केवळ शेतीच नव्हे तर स्थानिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि धरणात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई करून धरणातील पाण्याची तपासणी करावी, अशीही मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

याबाबत प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास शेतकरी आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!