शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील ८०१ हून अधिक ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी यापूर्वी स्मार्ट कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत नोंदणी केलेल्या ८०१ हून अधिक लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, अपर्णाताई डोके, मनिषाताई चिंचवडे तसेच भाजपा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले. कार्ड घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एसटी स्मार्ट कार्डमुळे पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवासातील सवलतीचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असून, त्याचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होणार आहे.
“प्रभागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अशाच लोकाभिमुख योजना आणि सेवा उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी यावेळी सांगितले.




Total Users : 228303