spot_img
spot_img
spot_img

MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि डॉ. विश्वजीत कदम यांचा सहभाग

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठीचे बहुचर्चित बेमुदत धरणे आंदोलन २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून एस. एम. जोशी पूल, नवी पेठ येथे सुरू होणार आहे. आज पुणे यांच्या समवेत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तांत्रिक कारणांमुळे २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला परवानगी देता येत नसली, तरी २ ऑक्टोबर रोजी (गांधी जयंती) मात्र आंदोलनास परवानगी देण्याबाबत पोलिसांनी सहमती दर्शविली आहे.

अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
MPSC विद्यार्थ्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाद्वारे आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी “त्यांचा कार्यकाळ आताच सुरू झाला असल्याने राजीनामा देता येणार नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. परंतु, अलीकडच्या कालावधीमध्ये विवेक भीमनवार यांच्या कारकिर्दीत काही पेपर फुटीची प्रकरणे समोर आल्यामुळे विद्यार्थी पूर्णतः आक्रमक झाले आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय आता आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत येत्या दोन दिवसांमध्ये MPSC विद्यार्थी आंदोलकांची एक संयुक्त बैठक होणार असून यात विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह इतर तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.

हे आंदोलन पूर्णतः अराजकीय, विद्यार्थ्यांसाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करणार: रोहित पवार
या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, “सदर आंदोलन हे पूर्णतः अराजकीय स्वरूपाचे असून केवळ विद्यार्थी हिताचे असल्याने यामध्ये आपण सहभागी आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळणे, परीक्षांची पेपरफुटी थांबणे या प्रमुख विषयांसाठी आपण विद्यार्थ्यांसाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी यात वेळीच लक्ष घालून विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेणे हेच योग्य ठरेल.”

गरज पडल्यास राहुल गांधीही आंदोलनात उपस्थित राहणार: डॉ. विश्वजीत कदम
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका काँग्रेस पक्षाची असून या आंदोलनाला काँग्रेसनेही मोठी ताकद दिली आहे. माजी मंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले की, “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांशी यापूर्वीच संवाद साधलेला असून त्यांच्या मागण्या सोडवण्या संदर्भामध्ये ते आग्रही आहेत. या आंदोलनामध्ये मी स्वतः पक्ष पातळीवर सहभागी होणार असून गरज पडल्यास राहुल गांधी हे देखील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पुण्यात उपस्थित राहतील.”

आज पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीला विद्यार्थी प्रतिनिधी व विविध पक्षीय नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे , रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रविकांत वरपे, माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनील माने , प्रथमेश अबनावे यांच्यासह आंदोलकांचे प्रमुख आयोजक व विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कांबळे, प्रमोद पाटील, विश्वजीत जाधव, संग्राम नरळे, किरण जगताप, सिद्धांत जांभुळकर, नितीन गीते, नितीन आंधळे, अजिनाथ केदार,, तसेच आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!