spot_img
spot_img
spot_img

पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘हास्य जत्रे’चा हास्यकल्लोळ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारलेल्या पुण्यातील रसिकांना विनोदाची मेजवानी देत एमएचजे लाईव्ह हा कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलअंतर्गत गणेश कला क्रीडा रंगमंदिरात उत्साहात पार पडला.खचाखच भरलेल्या सभागृहात कलाकारांनी सादर केलेल्या विविध विनोदी प्रसंगांना रसिकांनी शिट्ट्या, टाळ्या आणि ‘वन्स मोअर’च्या घोषणांनी उत्स्फूर्त दाद दिली.

पुण्याची अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने रंगमंचावर आगमन करताच, ‘काय पुणेकरांनो, गणपतीचे दर्शन झाले का? कोणते गणपती पाहिले?’ असा आपुलकीचा संवाद साधत वातावरणात रंग भरला. गणेशोत्सवाची सुरुवात ज्या पुण्यातून होते, त्याच पुण्यात एमएचजे लाईव्ह सादर करताना आनंद होत असल्याची भावना तिने व्यक्त केली.

समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, चेतना भट, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, पृथ्वी प्रताप, ओंकार भोजने, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत, दत्तू मोरे, अमीर हडकर, सुनील डांगे, दशरथ सिरसट, गणेश सागडे आणि अमित फाळके या कलाकारांनी विविध विनोदी प्रसंग सादर केले. ओंकार राऊत आणि चेतना भट यांच्या ५००व्या प्रयोगाचे औचित्यही यावेळी साधण्यात आले. मात्र, समीर चौघुले यांनी या ‘५००व्या प्रयोगात’ विनोदी पद्धतीने विघ्न आणल्याचा प्रसंग विशेष रंगला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मामा-मामी’ या लोकप्रिय पात्रांनी भाच्याच्या लग्नातील पूजेचा प्रसंग नाट्यरूपात सादर केला. शब्दांचे फुलोरे, अचूक वेळ साधून केलेले टोमणे आणि आवाजातील चढ-उतार यामुळे सभागृहात हास्याचे फवारे उडाले. नम्रता संभेराव यांचे ‘लॉली’ हे पात्र आणि प्रसाद खांडेकर यांच्यातील मनःशांती केंद्रातील जुगलबंदीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप आणि वनिता खरात यांनी ‘डाएटिशियन क्लिनिक’मधील पहिला रुग्ण हा प्रसंग सादर केला. त्यानंतर समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब आणि नम्रता संभेराव यांच्या ‘कोळी फॅमिली’च्या स्क्रिप्टने पुन्हा एकदा प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

यंदा महोत्सवाच्या माध्यमातून वर्षभरासाठी नेत्रदान मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती देण्यात दिली.

पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, ‘‘१९८९ मध्ये सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल सुरू केला. यंदा महोत्सवात विविध ठिकाणी ५३ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यातील धावपळीमध्ये एखादा विनोद मनाला विश्रांती देतो. एमएचजे लाईव्ह हा केवळ विनोदाचा कार्यक्रम नसून जीवनाशी जोडलेला आनंद आणि शिकवण देणारा अनुभव आहे.’’

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मांजर’ चित्रपटातील कलाकार तेजस राऊत, ओंकार भोजने आणि वैष्णवी आंधळे यांनी यावेळी चित्रपटाची माहिती दिली.

यावेळी मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक, आयकर विभागाचे अधिकारी नितीन वाघमोडे, अविनाश पाटील, नगरसेवक सुनील शिंदे, विश्वस्त मोहन टिल्लू आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!